सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
राज्याच्या प्रगतीत सहकार चळवळीचा मोठा हातभार – पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
लातूर, दि. ११ : सहकार चळवळ ही आपल्या राज्याची वेगळी ओळख आहे. राज्यातील लाखो संसार सहकारामुळे उभे राहिले आहेत. बदलत्या काळानुसार सहकाराचे स्वरूप बदलत असून या क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. तसेच, सहकार चळवळीने ग्रामीण भागासह संपूर्ण राज्याच्या प्रगतीला मोठा हातभार लावला आहे. सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या लातूर जिल्ह्यातील सहकारी संस्था व बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी आणि सहकार विभागाच्या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध होण्यासाठी ‘सहकार संकुल’ उपयुक्त ठरेल, असा विश्वास पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
लातूर येथे सहकार संकुल इमारतीचे भूमिपूजन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अध्यक्षतेखाली आणि लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला विधान परिषद सदस्य तथा मुख्य प्रतोद आमदार विक्रम काळे, जिल्हा परिषद अध्यक्षा उषाताई पाटील तळेगावकर, लातूरच्या महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दयानंद सुरवसे, समाज कल्याण सभापती उत्तम माने, अहमदपूर पंचायत समितीचे सभापती सूरज पाटील, विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण, जिल्हा उपनिबंधक व्ही. एल. पोतंगले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता रूपा राऊळ, अधीक्षक अभियंता बाबासाहेब थोरात यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सहकार चळवळीमुळे आजवर राज्यात मोठा रोजगार निर्माण झाला असून ही चळवळ जिवंत राहणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील सहकारी चळवळीचे माध्यम असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना केवळ पारंपारिक व्यवसायापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्या माध्यमातून किराणा दुकानांपासून ते जेनेरिक औषध दुकानांपर्यंत विविध नवे उद्योग व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. यामुळे सहकार क्षेत्रातून रोजगाराची नवनवीन दालने खुली होणार आहेत. बदलत्या काळात सहकार क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून, राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात सहकार चळवळ महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास सहकार मंत्री श्री. पाटील यांनी व्यक्त केला. राज्य शासनाने आणलेल्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच लातूर येथे उभारण्यात येणारे सहकार संकुल हे लातूरच्या वैभवात भर घालणारे आणि सहकार चळवळीला अधिक सक्षम करणारे ठरेल, असेही ते म्हणाले.
सहकार चळवळ बळकट करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय सुरु करून केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून शेतकरी व सहकारी संस्थांच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राला सहकाराची समृद्ध परंपरा आहे. राज्य शासनही सहकार चळवळीच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात सहकार संकुल उभारून सहकार विषयक विविध कार्यालये एकाच छताखाली आणण्याचे काम सुरू आहे. सहकारी संस्थांसाठी सर्व सेवा एकाच ठिकाणी मिळणार असून यामुळे वेळेची बचत आणि सेवांमध्ये सुलभता निर्माण होईल. संकुलाचे काम दर्जेदार, गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यावेळी म्हणाले.
राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेतील काही अटी वगळण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असून, याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या सहकारी संस्थांसाठी उभारण्यात येणारे सहकार संकुल वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, असे आमदार विक्रम काळे यावेळी म्हणाले.प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले. सहायक निबंधक श्री. गडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.





