23.1 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home विदर्भ शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- आ. सईताई डाहाके

शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा- आ. सईताई डाहाके

0
14
नागरिकांना सुलभ व पारदर्शक सेवा देण्यास प्रशासन कटिबद्ध- जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर
छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात 
वाशिम, दि. २२ जुलै – : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवा प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, नागरिकांना शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महसूल समाधान शिबिरासारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. नागरिकांनी अशा लोकाभिमुख उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे प्रतिपादन कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सईताई डाहाके यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उद्घाटन कारंजा विधानसभा मतदारसंघाच्या सदस्य आमदार श्रीमती सईताई डाहाके यांच्या हस्ते शेतकरी भवन, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, मंगरूळपीर रोड, कारंजा येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर,उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, तहसीलदार रवी महाले,मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी कारंजा पूनम राणे, तालुका कृषी अधिकारी अश्विनी भोसले, अतिरिक्त तहसीलदार तृप्ती खैरनार, नायब तहसीलदार विनोद हरणे, अनिल वाडेकर, लक्ष्मण बनसोडे, निरीक्षण अधिकारी स्मिता नायगावकर, दुय्यम निबंधक धनंजय देशपांडे, पोलीस निरीक्षक अमर चोरे तसेच नगर परिषद उपाध्यक्ष फिरोज शेकुवाले आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविकात तहसीलदार रवी महाले यांनी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा आणि लोककल्याणकारी योजना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत नागरिकांना सुलभ, पारदर्शक व त्वरित सेवा मिळाव्यात, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरामध्ये महसूल, आरोग्य, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, शिक्षण तसेच अन्य विभागांच्या विविध योजनांची माहिती, नोंदणी, अर्ज स्वीकृती, प्रमाणपत्रांचे वितरण आणि मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शासनाच्या विविध सेवा सुलभ, पारदर्शक आणि वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. महसूल विभागासह विविध शासकीय विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यामागे नागरिकांची गैरसोय दूर करण्याचा उद्देश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यानंतर कुंभेजकर यांनी पुढे बोलतांना स्वामित्व योजना, आयुष्मान भारत कार्ड तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागातील मालमत्ताधारकांना मालकी हक्क अधिक सक्षम होत असून विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र नागरिकांनी आरोग्य संरक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत प्रत्येक पात्र मतदाराने आवश्यक कागदपत्रांसह पडताळणीची प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करून लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
आ. श्रीमती डाहाके पुढे बोलतांना म्हणाल्या , आरोग्य ही खरी संपत्ती असून,शिबिरात उभारण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या स्टॉलवर नागरिकांनी तपासणी करून घ्यावी. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. रक्तदान करावे असे आवाहन केले. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी सांगितले. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून मतदार पडताळणीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शिबिरामध्ये महसूल विभागासह तालुक्यातील ३० शासकीय विभागांच्या माध्यमातून नागरिकांना विविध सेवा, दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. संजय गांधी निराधार योजनेचे १०, श्रावणबाळ योजनेचे १५, शिधापत्रिकांचे ६, पंचायत विभागामार्फत १७३, महसूल विभागामार्फत सातबारा, फेरफार, ८-अ, उत्पन्न दाखले आदी मिळून ८७४, महिला व बालविकास विभागामार्फत ५८, अश्या विविध विभागांच्या माध्यमातून एकूण २ हजार ९९३ दाखले, प्रमाणपत्रे व सेवांचा लाभ नागरिकांना देण्यात आला. शिबिरात नागरिकांच्या ३८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे तत्काळ निवारण करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली.
यावेळी विशेष विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. तसेच पानंद रस्ते अडथळामुक्त करण्यासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा, जनगणना आणि विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आरोग्य विभागामार्फत ४७६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.कार्यक्रमाला सरपंच, पोलिस पाटील, पत्रकार, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank