-
स्व. अजितदादा पवार जयंतीनिमित्त ‘जनसेवा सप्ताह’: कोलारगाव येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात
-
आमदार बडोले व वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती; उपस्थितांनी घेतला वृक्ष संगोपनाचा संकल्प
सडक अर्जुनी,दि.२२: “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ औपचारिक वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेल्या प्रत्येक वृक्षाचे संगोपन व संवर्धन करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. वृक्ष ही आपल्या भावी पिढ्यांसाठीची अमूल्य संपत्ती असून ‘हरित महाराष्ट्र’ घडविण्यासाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे,” असे ठाम प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी केले.दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित ‘जनसेवा सप्ताह’ अंतर्गत तालुक्यातील कोलारगाव (कोसबी) येथे भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
‘वर्षभरात किमान एक झाड लावून ते जगवा’ – बडोले यांचे आवाहन
पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देताना आमदार बडोले पुढे म्हणाले की, “वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे. निसर्गाचे देणे फेडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वर्षातून किमान एक तरी झाड लावून ते दत्तक घेतल्यासारखे जगवले पाहिजे.”
विविध प्रजातींच्या रोपांची लागवड
या कार्यक्रमादरम्यान परिसरातील हरित क्षेत्र वाढवणे आणि जैवविविधतेचे जतन करणे या उद्देशाने मान्यवरांच्या हस्ते विविध उपयुक्त व फलदायी प्रजातींच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. केवळ झाडे लावून न थांबता त्यांच्या नियमित संगोपनाचा आणि संरक्षणाचा निर्धारही सर्व उपस्थितांनी केला.
यावेळी नागपूर विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, क्षेत्रसंचालक पियुषा जगताप, उपवनसंरक्षक अतुल देवकर, डीएसएफ पद्धमनाथम, डीएफओ (सामाजिक वनीकरण) तुषार ढमढेरे, नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचे उपसंचालक प्रितमसिंग कोडापे, एसीएफ तडस, एसीएफ सुहास कांबळे, आरएफओ रामटेके मॅडम, आरएफओ भगत आणि आरएफओ आनंद मेश्राम,जिल्हा परिषद सदस्या कविताताई रंगारी, पंचायत समिती सभापती चेतनजी वडगाये, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, पं.स. सदस्य शालिंदर कापगते, महिला तालुकाध्यक्षा रजनीताई गिऱ्हेपुंजे, नगरसेवक आनंद अग्रवाल, भाजप महामंत्री प्रशांत शहारे, सरपंच नाशिकाताई लांजेवार, सतीश गहाणे आणि विवेक गहाणे,याप्रसंगी ग्रामवन समितीचे सदस्य, वनविभागाचे कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत उत्साही आणि निसर्गपूरक वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.





