-
चान्ना बाक्टी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
-
गरोदर माता, बालके आणि सिकलसेल रुग्णांसाठी विशेष तपासणी
अर्जुनी मोरगाव : “उत्तम आरोग्य हीच प्रत्येक व्यक्तीची खरी संपत्ती असून, आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या युगात अनेक आजार वेळेवर लक्षात येत नाहीत. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या आरोग्याबाबत सतर्क राहिले पाहिजे. नियमित तपासणी हीच खऱ्या अर्थाने निरोगी आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे,” असे प्रतिपादन गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून प्राथमिक आरोग्य केंद्र, चान्ना बाक्टी येथे मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला जि.प. अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी विशेष भेट देऊन पाहणी केली व उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधला.
शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचे आवाहन
उपस्थितांना मार्गदर्शन करताना भेंडारकर पुढे म्हणाले की, “गरोदर माता, बालके व महिलांचे आरोग्य सुरक्षित राहण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन मैलाचा दगड ठरते. विशेषतः आपल्या भागात सिकलसेलसारख्या आनुवंशिक आजारांचे प्रमाण विचारात घेता, त्याचे वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार शक्य होतात. शासनाच्या विविध कल्याणकारी आरोग्य योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
विविध आजारांवर मोफत तपासणी व उपचार
या शिबिरामध्ये गरोदर मातांची सर्वंकष वैद्यकीय तपासणी, सिकलसेल आजाराची मोफत चाचणी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ‘जनरल हेल्थ चेकअप’ची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. परिसरातील नागरिकांनी, विशेषतः महिलांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्या सौ. कुंदा लोगडे, चान्ना बाक्टीचे सरपंच सचिन डोंगरे, डॉ. अपूर्वा पाटील, डॉ. मिसार यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी व परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.शिबिराच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. अशा लोकोपयोगी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.





