24.7 C
Gondiā
Friday, August 7, 2026
Home गुन्हेवार्ता रानडुकराची शिकार; २० किलो मांसासह ४ आरोपी गजाआड

रानडुकराची शिकार; २० किलो मांसासह ४ आरोपी गजाआड

0
3

आमगाव : गोंदिया वनविभागांतर्गत येणाऱ्या आमगाव वनक्षेत्रातील मुंडीपार येथे रानडुकराची शिकार करून मटनावर ताव मारण्याच्या बेतात असलेल्या चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात वनविभागाला यश आले. आरोपींनी मोटरसायकलच्या क्लच वायरचा वापर करून फासे (सापळे) रचून ही शिकार केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्याकडून सुमारे २० किलो रानडुकराचे मांस जप्त करण्यात आले आहे. राजेश सोमाजी कुंभारे, छोटेलाल रुपचंद मरकाम, धनीराम श्रावण मतारे आणि दुर्गाप्रसाद बालचंद मरकाम सर्व रा. मुंडीपार अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सविस्तर असे की, आमगाव वनक्षेत्रातील मुंडीपार शिवारात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी सापळे
लावण्यात आल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे आमगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने तातडीने धाड कारवाई केली. या कारवाईत पथकाने राजेश सोमाजी कुंभारे, छोटेलाल रुपचंद मरकाम, धनीराम श्रावण मतारे व दुर्गाप्रसाद बालचंद मरकाम यांना ताब्यात घेतले. आरोपीकडून २० किलो मांस आणि शिकारीसाठी वापरलेले क्लच वायरचे सापळे जप्त करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ मधील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील सखोल तपास आमगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे परिसरात शिकारींचे धाबे दणाणले आहेत