24.2 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home गुन्हेवार्ता लाचखोर वनपाल, वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात;२० हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

लाचखोर वनपाल, वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात;२० हजाराची लाच घेताना रंगेहात अटक

0
8
वनविभागातील भ्रष्टाचार उघड
गोंदिया : रेती उपसा व वाहतुकीबाबत कारवाई न करण्यासाठी आणि गुन्हा दाखल न करण्यासाठी तब्बल २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपालासह दोन वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (ता.११) केली. रमेश सखाराम पचारे (५७) पद- वनपाल, निलोत्पल  हिरालाल शिकारे (३१)  पद-वनरक्षक व चिंटू मंगलसिंग परिहार (३८)  पद – वनरक्षक असे कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईने वनविभागात फोफावत चाललेला भ्रष्टाचार पुन्हा उजागर झाला आहे.
सविस्तर असे की, तक्रारदार यांचे घराचे बांधकाम सुरू असुन मार्च- २०२६ मध्ये घरासाठी लागणारी रेती गावाशेजारील नाल्यातून आणत असताना यातील वनपाल पचारे  यांनी तक्रारदार यांचा ट्रॅक्टर पकडला. दरम्यान तुझ्यावर रेती उपसा व वाहतुकी बाबत कारवाई करतो, असे सांगून कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी केली. ९ जुलै रोजी  तक्रारदार यांनी रॉयल्टीची आणलेली वाळू घराकडे टाकून मोकळे ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात असताना यातील वनपाल पाचारे व वनरक्षक शिकारे यांनी त्यांचे ट्रॅक्टर अडवून ट्रॅक्टरची चावी काढून घेतली. तसेच घराचे बांधकाम चालू केल्यापासून तू एकही रुपया दिला नाहीस, असे म्हणून २५ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी देत चावी देऊन निघून गेले. पुन्हा ५ ऑगस्ट रोजी पचारे यांनी तक्रारदाराला ८ ऑगस्ट रोजी राजोली परसटोला राऊंड ऑफिसर येथे हजर राहण्याबाबत नोटीस दिली. नोटीसनुसार तक्रारदार हे परसटोला राऊंड ऑफिस कार्यालयात हजर झाले असता पचारे व शिकारे यांनी आपण सेटलमेंट करू, असे म्हणून २५ हजाराऐवजी २० हजार रूपये द्यावे लागतील, असे  म्हणून लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने याची तक्रार १० ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
विभागाने तक्रारीची शहनिशा केली असता आरोपींनी लाच घेण्याची इच्छा दर्शविली. यावरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला. ११ ऑगस्ट रोजी राजोली सहवनक्षेत्र  परसटोला कार्यालयात आरोपी पचारे यांनी २० हजार रूपये लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तसेच त्याच वेळी आरोपी निलोत्पल  हिरालाल शिकारे व चिंटू मंगलसिंग परिहार सुद्धा समक्ष हजर होते. त्यांना सुद्धा त्याच वेळी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आरोपींविरूध्द केशोरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक दिगंबर प्रधान, अप्पर पोलिस अधिक्षक श्रीमती माधुरी बाविस्कर, अप्पर पोलिस अधिक्षक विजय माहुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक निलेश लोधी, पोलिस निरीक्षक उमाकांत उगले, अरविंद राऊत,  करपे, बोहरे, कहालकर, शेंडे, बोपचे, कापसे, काटकर, सोनवणे, बाटबर्वे, पटले, डांगे यांनी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने वनविभागातील भ्रष्टाचाराची पोलखोल झाली आहे. विभागातील वरिष्ठांनी आतातरी लक्ष देवून भ्रष्टाचारावर लगाम लावावा, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.
blank