25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविले

राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटविले

0
47

भंडारा,दि.28 : अतिक्रमणाने बरबटलेल्या भंडारा शहरात पुन्हा एकदा अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे, ही मोहीम राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांपासून सुरू करण्यात आली. जिल्हा प्रशासन, नगर पालिका व पोलिसांच्या संयुक्त सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येत आहे.

नगरपालिका निवडणूक आटोपताच जिल्हा प्रशासन व पालिका प्रशासन विकास कामांसह नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. आजच्या अतिक्रमण हटाव मोहीमेमुळे काम सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या बंगल्यापासून ही मोहीम मंगळवारी सकाळपासून सुरू करण्यात आली. तहसील कार्यालय, पंचायत समितीसमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होते, सदर अतिक्रमण जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये काढण्यात येईल, अशी दवंडी सोमवार सुनावण्यात आली होती. यात अतिक्रमण धारकांनी स्व:त अतिक्रमण काढून घ्यावे, असे दवंडीतून कळविण्यात आले होते. यानुसार ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नववर्षात राष्ट्रीय सुरक्षा पंधरवडा साजरा केला जाणार असल्यामुळे हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.