नागपूर फ्लाईंग कल्बला उड्डाण प्रशिक्षणासाठी डीजीसीएची मान्यता

0
8

नागपूर दि.२8 : नागपूर फलाईंग कल्बला केंद्र शासनाच्या नागरी विमान विभागामार्फत विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे. केंद्र शासनाच्या महासंचालक नागरी विमान कार्यालयातर्फे विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी पुन्हा परवानगी दिल्याचे पत्र उपसंचालक डीजीसीए यांचेकडून प्राप्त झाले आहे.
नागपूर फलाईंग कल्बचा विमान चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी डीजीसीएकडून परवानगी मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा तसेच तांत्रिक व प्रशिक्षीत मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या डीजीसीएच्या चमुने नुक्तीच नागपूर फलाईंग कल्बला भेट देऊन उपलब्ध सुविधांची पाहणी केली होती. त्यानुसार नागपूर फलाईंग कल्बला ९० दिवसासाठी पायलट प्रशिक्षणासाठी मान्यता मिळाली आहे.
नागपूर फलाईंग कल्बला नोव्हेंबर २०१५ पासून डीजीसीएच्या परवानगीसाठी प्रतिक्षा होती. नागपूर फलाईंग कल्बचे अध्यक्ष व विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी पायलट प्रशिक्षणासाठी परवानगी मिळावी यासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तसेच प्रशिक्षण परवानगीसाठी पाठपुरावा केल्यामुळे उड्डाण प्रशिक्षणाला परवानगी मिळाली आहे. दोन तांत्रिक अधिकारी व एक सहाय्यक यांची येत्या १५ दिवसात नियुक्ती केल्यानंतर येत्या एक महिन्याच्या आत पुढील पाच वर्षासाठी परवानगी मिळेल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
नागपूर फलाईंग कल्बच्या विमान उड्डाण प्रशिक्षणासाठी आवश्यक सुविधा तसेच पाठपुरावा करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक तथा महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, मुख्य उड्डाण निर्देशक शीव जयस्वाल यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच फलाईंग क्लब पुन्हा एकदा विमान प्रशिक्षणासाठी सज्ज झाला आहे. फलाईंग कल्बमध्ये १७ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून १० नवीन प्रशिक्षणार्थी निवड झाली आहे. नागरी उड्डाण महासंचालकांच्या कार्यालयातर्फे विमान उड्डाण प्रशिक्षणाची परवानगी मिळाल्यामुळे फलाईंग कल्ब आता नवी झेप घेत आहे. विभागीय आयुक्त तथा अध्यक्ष अनूप कुमार यांनी नागपूर फलाईंग कल्ब पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासंदर्भात आवश्यक सुधारणा करण्यात येतील, अशी माहिती यावेळी दिली.
०००