गोंदिया,दि.14 : ग्रामीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. जिल्ह्याचा मानवी विकास निर्देशांक वाढविण्यासाठी शिक्षण, आरोग्य व रोजगाराकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून ग्राम विकासाची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीनी ग्राम विकासाचे आराखडे तयार करावेत. असे आवाहन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
13 फेब्रुवारी रोजी कटंगीकला येथील मयूर लॉन येथे जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सरपंच मेळाव्याचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती छाया दसरे, समाज कल्याण समिती सभापती देवराज वडगाये, सालेकसा पंचायत समिती सभापती हिरालाल फाफनवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जि.प.सदस्य सर्वश्री गंगाधर परशुरामकर, लता दोनोडे, दुर्गा तिराले, कटंगीकला सरपंच कांता नागरीकर, यांची उपस्थिती होती.
बडोले पुढे म्हणाले, जिल्हा लवकरच हागणदारीमुक्त घोषित होणार आहे. यासाठी सरपंच व सचिव तसेच ग्रामस्थ यांनी जो पुढाकार घेतला यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत. गावे स्वच्छ झाली तर देश स्वच्छ होईल. शौचास उघड्यावर बसण्याची मनोवृत्ती बदलणे गरजचे आहे. प्रतयेक ग्रामपंचायतीनी चौकाचौकात कचराकुंड्या बसविण्यात याव्यात. जिल्हा डासमुक्त व शौचमुक्त झाला तर संपूर्ण जिल्हा रोगराईमुक्त होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. इंटरनेटवर अनेक ठिकाणी रोजगाराच्या व नोकरीच्या संधी असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील सर्वच शाळा डिजीटल झाल्यास विविध प्रकारचे शिक्षण मिळण्यास मदत होणार असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला गती मिळणार असल्याची त्यांनी सांगितले.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, सरपंच आणि सचिवाचे नाते दिवा आणि वातीसारखे आहे. कोणतेही उलटसुलट काम होणार नाही याची काळजी घ्यावी. गावाच्या विकासासाठी मिळणारा निधी योग्य वेळेत व योग्यप्रकारे पारदर्शकतेने खर्च करावा. सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो. गावातील अनेक समस्यांचा सामना त्यांना करावा लागतो. एका सचिवाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीची जबाबदारी असल्यामुळे ही जबाबदारी योग्य समन्वयातून पार पाडावा. चौदाव्या वित्त आयोगातून मिळणाऱ्या निधीचा ग्रामपंचायतीने योग्यप्रकारे खर्च करावा. गावातील आंगणवाडी दुरुस्ती, शाळा दुरुस्ती, पाण्याची व्यवस्था याकडे लक्ष दयावे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार ग्रामपंचायतचे कामकाज सरपंच व सचिवांनी करावे व याबाबत असलेल्या नियमाची माहिती सरपंचाला असली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
आमदार पुराम म्हणाले, सरपंच व सचिवाचा गावाच्या विकासासाठी समन्वय आवश्यक आहे. ग्रामसेवकाने ग्रामविकासाची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी. सरपंचाने सुध्दा गावाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांचा अभ्यास करावा. सरपंच व सचिव हे गावाच्या विकासाचे मुख्य चाके असून सरपंचांना विकासाच्या बाबतीत प्रशिक्षण मिळाले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
श्रीमती गहाणे म्हणाल्या, चौदाव्या वित्त आयोगाचा निधी कसा खर्च करावा याचे नियोजन प्रत्येक ग्रामपंचायतीने काळजीपूर्वक करावे. राज्यघटनेतून जे अधिकार मिळाले आहेत त्याचा योग्यप्रकारे गावाच्या विकासासाठी वापर करावा. ग्रामपंचायतचे प्रमुख म्हणून सरपंचानी काम करीत असतांना गावातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे असे त्या म्हणाल्या.
प्रास्ताविकातून डॉ.पुलकुंडवार म्हणाले, लवकरच जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात येणार आहे. 2011 च्या बेसलाईन सर्वेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले असून 35 हजारापेक्षा जास्त शौचालय जिल्ह्यात बांधण्यात आली आहे. वाढीव कुटुंबांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शौचालय बांधून देण्यात येणार आहे. नादुरुस्त शौचालयाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. उघड्यावर शौचास जाण्याची वृत्ती बंद केली पाहिजे. आता उघड्यावर बसणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल. जिल्हा हागणदारीमुक्त झाल्यानंतर निरंतर स्वच्छतेचे निकष पाळावे लागणार आहे.
ग्रामगितेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेले विचार प्रत्येक्षात अंमलात आणावे असून सांगून डॉ.पुलकुंडवार पुढ म्हणाले, आपल्या भावी पिढ्यांसाठी आपण काम करतो या भावनेतून काम करावे. शिक्षण, आरोग्य, पोषण, निवारा यासुध्दा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहे. शिक्षकांनी, लोकप्रतिनिधींनी आणि पालकांनी बालकांच्या शिक्षणाप्रती जागृत राहणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सप्त खंजेरी वादक तुषार सूर्यवंशी यांनी प्रारंभी उपस्थितांचे प्रबोधन केले. संपूर्ण स्वच्छता व गावाचा विकास यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, चौदावा वित्त आयोग-निधी खर्च यावर गटविकास अधिकारी नारायण जमईवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्ह्यातील सरपंच, सचिव, ग्रामविकास अधिकारी, जि.प.सदस्य, गटविकास अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संचालन विस्तार अधिकारी वैशाली खोब्रागडे व जी.टी.सिंगनजुडे यांनी केले. आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे यांनी मानले.





