23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ बँकांनी मुद्रा योजना प्रभावीपणे राबवावी-आ.गोपालदास अग्रवाल

बँकांनी मुद्रा योजना प्रभावीपणे राबवावी-आ.गोपालदास अग्रवाल

0
21

गोंदियात मुद्रा योजना मेळावा व उत्कर्षची सभा
गोंदिया,दि.१७ : बेरोजगार युवक-युवती आणि गरजू व्यक्तींना उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वावलंबी बनविण्यासाठी त्वरित कर्ज देण्याची सुविधा प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तींना रोजगार उभारुन स्वावलंबी करण्यासाठी बँकांनी मुद्रा बँक योजना प्रभावीपणे राबवावी. असे प्रतिपादन राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
१६ जून रोजी गोंदिया येथील जैन कुशल सभागृहात महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त वतीने आयोजित प्रधानमंत्री मुद्रा योजना कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन मेळावा व उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्र गोंदियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उदघाटक म्हणून आमदार अग्रवाल बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे हया होत्या. प्रमुख अतिथी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे, अर्जुनी/मोरगावच्या उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, लेखा अधिकारी श्री.बावीसकर, प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी मिलींद रामटेके, उत्कर्ष लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्ष दिपाली वैद्य, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा अग्रणी प्रबंधक अनिल श्रीवास्तव, सहायक रोजगार व कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश गणराज, उद्योग निरिक्षक श्री.राठोड, स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या आर्थिक साक्षरता कक्षाचे व्यवस्थापक श्री.पहिरे, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांची उपस्थिती होती.
मागील दोन वर्षात मुद्रा बँक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात १२३ कोटी रुपये कर्ज रोजगार निर्मितीसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगून श्री.अग्रवाल पुढे म्हणाले, यापूर्वी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांनी रोजगार निर्मितीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन दिलेले नाही. गोंदियात बचतगटांच्या उत्पादित वस्तूंची विक्री करण्यासाठी जयस्तंभ चौकातील वन विभागाच्या जागेवर मॉल उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. ही वन विभागाची जागा माविमला मिळाली पाहिजे यासाठी आपला आग्रह राहणार आहे. या जागेवर हॉल, शॉपींग, कॉम्पलेक्स व माविमचे कार्यालय अशी एक चांगली वास्तू बनविण्यासाठी निश्चितच पुढाकार घेण्यात येईल. बचतगटाच्या महिलांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम माविम करीत असल्यामुळे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीमती मेंढे म्हणाल्या, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात राबविण्यात येतात. त्या विविध योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. बचतगटातील महिलांना वैयक्तीकरित्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना अत्यंत महत्वाची आहे. या योजनेच्या माध्यमातून ५० हजार ते १० लक्ष रुपयापर्यंतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  बचतगटातील महिलांना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील असून माविमच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण महिलांच्या प्रगतीला दिशा मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.महिरे म्हणाले, बचतगटामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या माध्यमातून बचतगटातील महिलांना वैयक्तीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. बचतगटातील महिलांना शासकीय इमारतीत खाणावळ तसेच कॅन्टीन सुरु करण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करुन देण्यास आपण प्रयत्नशील आहोत. बचतगटातील महिला ज्या वस्तू व साहित्याची निर्मिती करतात त्याची गुणवत्ता ही उत्तमच असते. त्यामुळे त्यांना चांगला पैसा मिळण्यास मदत होते. माविमने बचतगटातील महिलांच्या प्रगतीच्या दृष्टीने आणखी जोमाने काम करावे असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट ग्रामसंस्था म्हणून झाशीची राणी ग्रामसंस्था पिंडकेपार, सर्वात जास्त १० लक्ष ५० हजार कर्ज घेणाऱ्या बाघोली येथील महेश्वरी महिला बचतगट, ८ लक्ष रुपये कर्ज घेणारा अंभोरा येथील सावित्री महिला बचतगट, उत्तम पशुसखी म्हणून डव्वा येथील सुनिता ठाकरे, उत्कृष्ट सहयोगिनी म्हणून सुनिता कटरे, कुंजलता भुरकुडे, उत्कृष्ट इंटरनेट साथी म्हणून गिता भोयर, उत्कृष्ट उद्योजक म्हणून एकोडी येथील गुल महिला बचतगट, उत्कृष्ट महिला उद्योजक म्हणून राणु वर्मा यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील शिशु गटातून बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने चिचगाव येथील सरिता रहांगडाले यांना शिवणकामासाठी ४५ हजार रुपये कर्जाचे मंजूरीपत्र, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वतीने गोंदिया येथील हितेंद्र राहूलकर यांना किशोर गटातून १ लक्ष रुपये कर्जाचे मंजूरीपत्र, गोरेगाव येथील दिगंबर बंसोड याला किशोर गटातून १ लक्ष २० हजार रुपये दुग्ध व्यवसायासाठी कर्जाचे मंजूरीपत्र, कामठा येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या वतीने ३ लाभार्थ्यांना शिशु गटातून कर्जाचे मंजूरीपत्र मान्यवरांचे हस्ते देण्यात आले.
यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रच्या करुणा आगडे, बँक ऑफ बडोदाचे नितीन मौदेकर, स्टेट बँक ऑफ इंडियाचे तरुण चॅटर्जी, बँक ऑफ इंडियाचे एस.पी.त्रिवेदी, कॅनरा बँकेचे श्री.रमणकुमार यांचीही मंचावर उपस्थिती होती. यावेळी अलका रंगारी, रामू वर्मा, अनिता बडगे, निशा ठवकर या बचतगटातील महिलांनी करीत असलेल्या उद्योगाबाबतची माहिती दिली.  यशस्वीतेसाठी माविमचे सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, सहायक सनियंत्रण अधिकारी प्रदिप कुकडकर, लेखाधिकारी योगेश वैरागडे, प्रियंका मुंजे, नामदेव बांगरे, सुशील पंचभाई, प्रफुल्ल अवघड, एकांत वरधने, केंद्राचे व्यवस्थापक मोनिता चौधरी, लेखापाल आशिष बारापात्रे, उपजिविका समन्वयक कुंदा डोंगरे, क्षमता बांधणी समन्वयक चित्ररेखा जतपेले, सहयोगीनी सुनिता कटरे, हेमलता पडोळे, कुंजलता भुरकुडे, तेजश्वरी येरकुडे, पुनम साखरे, सुर्यकांता मेश्राम, रोहिणी साखरे, शालु मेश्राम, दुर्गा रंगारी, गीता भोयर, जिल्हा माहिती कार्यालयाचे पंढरी लुटे व ज्ञानेश्वर वावडेकर यांनी परिश्रम घेतले.

blank