राज्य कर्करोग संस्थेसाठी 35 कोटींचा पहिला हप्ता केंद्राकडून मंजूर

0
12

मुंबई, दि. 16: औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्यात आला असून ही संस्था सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाने जलदगतीने कार्यवाही केली. त्यानुसार केंद्र सरकारने 35 कोटींच्या अनुदानाचा पहिला हप्ता महाराष्ट्राला मंजूर केला आहे.
महाराष्ट्रातील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन या गंभीर आजारावरील उपचारासाठी प्रभावशाली यंत्रणा राज्यात उभारण्याच्या दृष्टीने औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा देण्याचा निर्णय औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत घेण्यात आला होता. केंद्र
शासनाच्या कुटुंब व आरोग्य कल्याण विभागामार्फत नॅशनल प्रोग्रॅम फॉर प्रिव्हेंशन ॲण्ड कंट्रोल ऑफ कॅन्सर, डायबेटीस, सीव्हीडी आणि स्ट्रोक (एन.पी.सी.डी.सी.एस.) या कार्यक्रमांतर्गत राज्य कर्करोग संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या भागीदारीने देशातील प्रत्येक राज्यात कर्करोग संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यासाठी मिळणाऱ्या एकूण 120 कोटी रुपये खर्चापैकी केंद्राच्या वाट्यातील 75 टक्के निधी हा संबंधित राज्यांनी समाधानकारक
कार्यवाही केल्यानंतरच देण्यात येणार आहे. संस्थेच्या स्थापनेसंदर्भात महाराष्ट्राने दाखवलेली गंभीरता आणि तत्परता यामुळे केंद्राने तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य कर्करोग संस्थेची स्थापना होताच वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी जलदगतीने पाठपुरावा आणि कार्यवाही सुरु केली. राज्य सरकारने संस्थेच्या इमारतीसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. टाटा रुग्णालयाचे प्रशासकीय संचालक डॉ. कैलास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर्करोग संस्थेत नियमित 2 कर्करोग विशेषज्ज्ञ नेमण्यात आले. यामुळे या केंद्रात कर्करुग्णांवर उपचार सुरु झाले असून यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने टाटा मेमोरियल रुग्णालय व केंद्र सरकारचा अणु ऊर्जा विभाग यांचे सहकार्य घेतले.
अणुऊर्जा विभागाने रेडिओथेरपीसाठी ‘भाभाट्रॉन-II’ हे अत्याधुनिक विशेष संयंत्र उपलब्ध करुन दिल्यामुळे त्यास वेग आला आहे. कर्करुग्णांवरील रेडिओथेरपी उपचारांसाठी असलेले ‘भाभाट्रॉन’ या अत्याधुनिक विशेष संयंत्रास मोठी मागणी असून भारताच्या अणुऊर्जा विभागाने इतर अनेक देशांनाही ते उपलब्ध करून दिले आहे. या संस्थेस मिळालेल्या
संयंत्रासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.