भंडारा दि.१७ : देशीदारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील रॅकेटचा पर्दाफाश करण्यात भंडारा जिल्हा पोलिसांना शुक्रवारी यश आले. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय तथा वाचक शाखेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन लक्ष ९३ हजार ५४ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.सदर कारवाही जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. वाकडे, पोलीस हवालदार रवी फुलसुंगे, पोलीस नायक दिनु मते, महेश कडव, मुकेश पांडेकर, पोलीस शिपाई लोकेश पोटवार व आरसीपी पथक, पोलीस नियंत्रण कक्ष यांच्या वतीने करण्यात आली.
पवनी तालुक्यातील बाह्मणी परिसरात काही इसम अवैधरीत्या देशी दारूची पेट्यांमधून वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाचक शाखेला मिळाली.खबऱ्यांनी दिलेल्या माहितीची शहानिशा करुन काल मध्यरात्रीच्या सुमारास एका काळ्या रंगाच्या चारचाकी क्रमांक एम एच ३१ ए एच ०२६७ या वाहनाला ताब्यात घेण्यात आले. सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात देशी दारूच्या पेट्या आढळून आल्या.यावेळी पोलिसांनी गाडीचालक वैभव संभाजी कोरे (२४) रा. मेंढा ता. नागभिड, रंजीत राजकुमार खोब्रागडे रा. मोहाडी ता. नागभिड, अजय रेखचंद अलोणे रा. मोहाडी ता. नागभिड व श्रीनिवास कोलावार रा. पवनी याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. यात वाहनांमधून देशीदारूच्या आठ पेट्या अन्य कंपनीच्या नावे असलेल्या २७ पेट्या व १८७ पव्वे जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या एकूण साहित्यांची किंमत २ लक्ष ९३ हजार ५४ रुपये सांगण्यात येते. सर्व पाचही जणांविरुद्ध पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




