प्रवासी सुविधांसाठी महाव्यवस्थापकांशी चर्चा

0
7

गोंदिया दि.१७ :  दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सोईन यांच्यासोबत मुख्यालयात प्रवासी सुविधांबाबत बैठक घेण्यात आली. या वेळी केंद्रीय रेल्वे समितीचे माजी सदस्य रमनकुमार मेठी, झेडआरयूसीसी सदस्य चीनू अजमेरा, महेश आहुजा, कृष्णकुमार बत्रा, राजेंद्र व्यास, नारायण भूषणिया, राजेंद्र जग्गी व दीपक शर्मा उपस्थित होते.

याप्रसंगी रेल्वे प्रवासीविषयक विविध विषयांवर चर्चा झाली. चीनू अजमेरा यांनी निवेदनाचे वाचन केले. यात नागपूर-पुणे गरीब रथ व पुणे-नागपूर एक्सप्रेस, इंदोर-नागपूर एक्सप्रेस व अमरावती-नागपूर इंटरसिटीला गोंदियापर्यंत विस्तारित करण्यात यावे. गुजरात मार्गावर संचालित होणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी राहते. त्यामुळे हावडा-पोरबंदर, सांत्रागाछी-पोरबंदर व मालदा टाऊन-सूरत गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्या.

गोंदिया ते द्वारका सुपरफास्ट ट्रेन सुरू करावी. पुरी-सोमनाथ एक्सप्रेसला नियमित करावे. गोंदिया ते शेगावसाठी इंटरसिटी एक्सप्रेस चालवावे. गोंदिया-रायगड जनशताब्दी एक्सप्रेसचा थांबा आमगाव तथा गोंदिया-बरोनी एक्सप्रेसचा थांबा सालेकसा येथे द्यावे. कॅन्सर व थॅलेसिमिया पीडित रूग्णांच्या उपचारासाठी प्रवासात ये-जासाठी प्रशासन सुट देते. परंतु गोंदिया-मुंबई-गोंदिया एक्सप्रेसमध्ये या रूग्णांसाठी आरक्षित कोटा राहत नसल्याने त्यांना उपचारासाठी येण्याजाण्यात मोठीच असुविधा होते. त्यामुळे त्यांची व्यवस्था करण्यात यावी, आदी मागण्यांचा समावेश होता.महाव्यवस्थापक सोईन यांनी काही विषयांना घेवून संबंधित विभागांना अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. उपमहाव्यवस्थापक व झेडआरयूसीसी सचिव प्रकाशचंद्र त्रिपाठी व महाव्यवस्थापकांचे सचिव हिमांशू जैन उपस्थित होते.