
यवतमाळ, दि. 8 – जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आर्णी-केळापूर मतदारसंघाच्या आमदाराने आपल्या मतदारसंघात कामे करणाºया कंत्राटदाराला मोबाईलवरून ‘रॉयल्टी’ची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या संभाषणाची आॅडिओ क्लीप गुरुवारी व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी बुधवारी दुपारी ९३७२०७९५९५ या क्रमांकाच्या मोबाईल फोनवरून शिवदल लखीमचंद शर्मा, रा. सत्यनारायण ले-आऊट यवतमाळ, यांच्या ९४२२१६८९७८ या मोबाईल क्रमांकावर फोन केला. शर्मा यांनी हा कॉल रेकॉर्ड केला. सुरूवातीला आमदारांनी कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले. कामाची बिले का थांबली, अशी विचारणा केली. त्यावर कंत्राटदाराने बिले का थांबली, असे विचारताच बांधकामच्या अधिकाºयांनी सांगितले नाही काय, माझ्या मतदारसंघात काम करायचे असेल, तर माझे काम करावेच लागेल, असा दम शर्मा यांना भरला. शर्मा यांनी माझा मुलगा अपघातात गंभीर जखमी झाल्याने तो कोमात आहे, त्यामुळे मी काहीच करू शकत नाही, असे उत्तर दिले. तसेच पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे तक्रार करतो, असे म्हणताच आमदार भडकले. त्यांनी पालकमंत्रीच नव्हे, तर मुख्यमंत्र्यांकडे जा, अशा शब्दात शर्मा यांना दम भरला.





