
मुंबई,दि.16ः- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत असून निवडणूक आयोगाने बुधवारी याबाबतचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
राणे यांच्या मंत्रिमंडळ समावेशाची चर्चा राजकीय वतुर्ळात रंगलेली असतानाच विधान परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. २१ सप्टेंबर रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देताना विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला होता. १२ वर्षात काँग्रेसमध्ये झालेली ससेहोलपट, खदखद त्यावेळी राणेंनी व्यक्त केली होती. राणे यांनी थेट भाजपात थेट प्रवेश न करता स्वतंत्र पक्ष काढला. त्यानंतर त्यांचा स्वाभिमान पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाला आहे.
नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त जागेसाठी भाजपाकडून नारायण राणे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाला विरोध दर्शवित आहे. त्यामुळे राणे विरोधात शिवसेना आपला उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.





