गोंदिया,दि.७ : कायदयामध्ये अधिकार व कर्तव्ये दिले आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकारी काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरित्या जगू शकत नाही. माणसाने आपल्या कर्तव्याचे योग्यरित्या पालन केले तर त्याच्या हातून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही. प्रत्येक व्यक्तीला कायदयाची जाणीव असणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन नागपूरचे रेल्वे न्यायदंडाधिकारी एस.एन.फड यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रेल्वे विभाग व जिल्हा वकील संघ गोंदिया यांच्या संयुक्त वतीने नुकतेच पोलीस आणि नागरीक समन्वय, घरगुती हिंसाचार कायदा, रेल्वेशी संबंधीत कायदे व बालकांशी संबंधीत योजना या विषयावर रेल्वे अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाकरीता कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी न्या.फड बोलत होते. यावेळी नागपूरचे मंडल सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश राऊत, प्रा.माधुरी नासरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री.पांडे म्हणाले, रेल्वेमध्ये प्रवास करतांना पुरुषांनी महिला आरक्षण डब्यामध्ये प्रवास करु नये. असे केल्यास कलम १६२ नुसार तो गुन्हा आहे. दरवाज्याजवळील पायऱ्याजवळ उभे राहून प्रवास करणे हा देखील गुन्हा आहे. कोणतेही कारण नसतांना गाडी थांबविण्यासाठी चैन ओढणे हा देखील गुन्हा असल्याचे सांगून ते म्हणाले, रेल्वेमध्ये प्रवास करतांना विना परवाना सामानाची विक्री करणे हा देखील गुन्हा असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री.राऊत म्हणाले, पोलीस आणि जनता यांच्यात एकता असेल तर आपण चांगल्याप्रकारे काम करु शकतो. कायदयाची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. यावर न्यायालयाची नजर असते. दखलपात्र गुन्हयांमध्ये तपास करण्याचे अधिकारी पोलिसांना असतात. पुराव्याचे आधारावर दोषारोप पत्र दाखल करता येते. एखादी व्यक्ती खोटी तक्रार करीत असेल तर त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविता येतो असे त्यांनी सांगितले.
प्रा.श्रीमती नासरे म्हणाल्या, बालकांची जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. एखादया मुलाला वडील किंवा पालक नसेल तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. एखादा मुलगा अनाथ असेल तर त्याच्याकरीता बाल शिशुगृहाची व्यवस्था आहे. अज्ञान मुला-मुलींकडून गुन्हा झाल्यास कमी वयात लग्न केल्यास पोसको कायदयाअंतर्गत शिक्षा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक आर.जी.बोरीकर, जी.सी.ठवकर, दिपाली थोरात, एल.पी.पारधी, पी.एन.गजभिये, ए.जे.नंदेश्वर, गुरुदयाल जैतवार, रविंद्रकुमार बडगे यांनी परिश्रम घेतले. संचालन व उपस्थितांचे आभार श्रीमती एम.पी.चतुर्वेदी यांनी मानले.





