23.7 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ कॅम्पा निधीतील अनियमिततेचे प्रकरण, वन विभागात धास्ती

कॅम्पा निधीतील अनियमिततेचे प्रकरण, वन विभागात धास्ती

0
19

भंडारा,दि.7ः-भंडारा वन विभागात (प्रादेशिक) कॅम्पा योजनेंतर्गत झालेल्या अनियमिततेची चौकशी झाल्यानंतर तो अहवाल मुख्य वनसंरक्षक गौर संजीव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालाचे अवलोकन सुरू असून दोषी आढळलेल्या वनाधिकार्‍यांवर लवकरच निश्‍चित कारवाई होणार असल्याने संपूर्ण वनविभागात धास्ती निर्माण झाली आहे.
मागील वर्षी भंडारा वन विभागाला कॅम्पा योजनेतून विविध कामांसाठी निधी प्राप्त झाला होता. या निधीतून जलयुक्त शिवार, डिपसीसीटी, रोपवन, दुरुस्ती आदी कामे करावयाची होती. कामानुसार सर्व वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या खात्यावर निधी जमा करण्यात आला. ही कामे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, या कामांमध्ये अनियमितता झाली. कामे न करताच निधीची उचल करण्यात आली. मार्च महिन्यात झालेल्या लेखा परिक्षणात अनेक त्रृट्या आढळून आल्या. याबाबत वन विभागाच्या मुख्य कार्यालयात तक्र ारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुख्य वनसंरक्षक गौर संजीव यांनी सहाय्यक वनसंरक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांची चौकशी समिती गठीत केली. ऑगस्ट महिन्यात या समितीने जिल्ह्यातील सर्व कामांची चौकशी केली. यामध्ये अनेक त्रुट्या आढळून आल्या.
वनतलावांना पिचिंग न करणे, रोपवनाच्या बाहेर खड्डे खोदणे, डिपसीसीटीमध्ये अनियमितता आदी प्रकार आढळून आले. चौकशी समितीने तसा अहवाल मुख्य वनसंरक्षकांना पाठविला. आता या अहवालाचे अवलोकन सुरू असून त्यामध्ये काही ‘शॉर्ट फॉल’ आढळून आले आहेत. अहवालाच्या संपूर्ण अभ्यासाअंती कारवाई अटळ असल्याने वन विभागात धास्ती निर्माण झाली आहे.