28.5 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

नागपूर-भंडारा रोडवर अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार

0
25

नागपूर दि.१२-:  भंडाऱ्याहून नागपूरकडे येत असलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव टिप्परने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव टर्निंगजवळ सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास झाला.
मृतांमध्ये सुशील वसंत जावळे (३०), त्याचे वडील वसंत जावळे (६१), आई पुष्पा जावळे (५८) तिघेही रा. शक्तीनगर, खरबी रोड, नागपूर अशी मृतांची नावे आहेत. जावळे कुटुंबीय एमएच-४९/एई-२५३६ क्रमांकाच्या कारने पवनी (जि. भंडारा) येथे गेले होते. तेथून परत येत असताना त्यांच्या कारला एमएच-४०/बीजी-८०७ क्रमांकाच्या टिप्परने जोरदार धडक दिली. त्यात सुशीलचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याच्या आई-वडिलांना मेडिकलमध्ये भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातानंतर कार चक्काचूर झाली होती. याप्रकरणी कुही पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. टिप्पर चालक कन्हैयालाल पटेल (२८, रा. राजनांदगाव, छत्तीसगड) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुशील हा बुटीबोरी एमआयडीसीतील कंपनीत कार्यरत होता. पवनी येथे तो त्याची पत्नी पद्मिनी आणि चार महिन्याचा मुलगा कौस्तुभला आणण्यासाठी गेला होता. परंतु त्याचे सासरे बंडू भोयर आणि इतरांनी काही दिवस राहू देण्याची विनंती केली. त्यानंतर तो आई-वडिलांसह नागपूरसाठी निघाला. दरम्यान त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला.

blank