गडचिरोली : चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या औद्योगिक प्रकल्पामुळे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या मार्कंडादेव मंदिर परिसरासह वैनगंगा नदीच्या प्रदूषणाचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करत मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्था, महाराष्ट्रचे अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी पर्यावरण विभागाकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सायन, मुंबई आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
श्रीमंत संतोष सुरपाम यांनी आपल्या निवेदनात मार्कंडादेव मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असून, दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात, तसेच वैनगंगा नदी परिसरातील धार्मिक विधींसाठीही भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, असे नमूद केले आहे. वैनगंगा नदी ही गडचिरोली जिल्ह्यातील महत्त्वाची जलस्रोत असून, नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास भविष्यात नागरिकांसमोर गंभीर पाणीटंचाई व आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पातून कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया न केलेले अथवा दूषित सांडपाणी नदीत सोडले जाऊ नये, यासाठी कठोर पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करावी. तसेच मार्कंडादेव मंदिर परिसर व सभोवतालच्या पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि मंदिराच्या ऐतिहासिक वारसा स्थळाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती.
या मागणीच्या अनुषंगाने पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ७ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र जारी केले आहे. विभागाच्या अवर सचिव तथा शाखा अधिकारी अर्चना परशरामे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आणि गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना संबंधित निवेदनाची प्रत पाठवून त्यातील मागण्यांनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सदर बाबतचा अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शासनाच्या या निर्देशामुळे प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले असून, मार्कंडादेव मंदिर परिसर आणि वैनगंगा नदीच्या संरक्षणाबाबत पुढील कार्यवाहीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





