गडचिरोली, दि.2: नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शांतता व अहिंसेचा संदेश देण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने ‘गांधी विचार आणि अहिंसा’ या पुस्तकातील गांधीजींचे विचार वाचून दाखविण्याचा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ३ मार्च रोजी तब्बल ७ हजार श्रोत्यांपुढे हा कार्यक्रम होणार असून, त्याची नोंद गिनीज बुकात होणार असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ.महेश्वर रेड्डी यांनी सांगितले की, पुण्याच्या आदर्श मित्र मंडळाने या कामी पुढाकार घेतला असून, श्रीलक्ष्मी नृसिंह पतसंस्था व उडाण फाउंडेशन त्यांना सहकार्य करीत आहे. पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमात जिल्ह्याच्या विविध भागातील विद्यार्थी, नागरिक, पोलिस पाटील, केंद्रीय व राज्य राखीव दलाचे जवान सहभागी होणार आहेत. एकाच वेळी एखाद्या लेखकाच्या पुस्तकातील काही मजकूर ५ हजार ७५० जणांनी श्रवण करण्याचा विश्वविक्रम तुर्कस्तानने केला आहे. मात्र, ३ मार्चला गडचिरोलीत होणार कार्यक्रम तुर्कस्तानचा विक्रम मोडणार आहे. यामुळे जिल्ह्यात शांतता व अहिंसेचा संदेश जाईल, असा विश्वास डॉ.रेड्डी यांनी व्यक्त केला. याच दिवशी पोलिस पाटलांचा मेळावा घेण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.पत्रकार परिषदेला सीआरपीएफच्या बटालियन ९ चे कमांडंट रवींद्र भगत, बटालियन १९२ चे कमांडंट मनोजकुमार, अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजा रामासामी, महेंद्र पंडित, डॉ.हरी बालाजी उपस्थित होते.





