यवतमाळ ,दि.10- गरीबी व कर्जबाजारीपणास कंटाळून महागाव तालुक्यातील सुधाकरनगर (पेढी ) येथील कर्जबाजारी शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. श्रीराम सिताराम पवार (वय 50) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.गावात घरोघरी दिवाळीच्या अभ्यंगस्नानाची तयारी सुरू असताना भल्या पहाटे शेतकऱ्याने विहिरीतील खोल पाण्यात जलसमाधी घेतल्याने पेढी गावावर शोककळा पसरली आहे. श्रीराम पवार याच्याकडे १ हेक्टर ८६ आर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापीकीमुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते. युनियन बँकेच्या कर्जाचा बोजाही त्यांच्या डोक्यावर होता. गतवर्षी खासगी कर्ज काढून त्यांनी मोठ्या मुलीचे लग्न उरकले. या वर्षी आणखी एका उपवर मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना सतावत होती. काल गुरुवारी (ता. ८) सकाळी ५ वाजता श्रीराम पवार यांनी तांड्यातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना कळवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, २ मुली, १ मुलगा व मोठा आप्त परिवार आहे.





