गोंदिया दि.२१ः- : माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध लोकहितोपयोगी कार्यक्रम घेण्यात येतात. गतवर्षी जिल्हा भाजपच्या वतीने मॅरेथॉन दौड घेण्यात आली होती. यावर्षी देखील मॅरेथॉन दौड घेण्यात येणार आहे. यावर्षी घेण्यात आलेल्या मॅरेथॉनला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. जिल्हास्तरीय या मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातील १००० स्पर्धक सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत ३०० नोंदणी ऑनलाईन आणि शंभरावर ऑफलाईन नोंदणी पूर्ण झाली आहे. प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला २१०००, द्वितीय ११०००, तृतीय ७००० आणि चौथ्या स्पर्धकाला ५००० रुपयांचे पारितोषीक देण्यात येणार आहे. तसेच पाचवा ते दहाव्या क्रमाकाच्या स्पर्धकांना प्रत्येकी ११०० रुपयांचे प्रोत्साहन पारितोषीक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना राज्य आणि देशपातळीवर देखील संधी मिळणार आहे. ही स्पर्धा नि:शुल्क असून २५ डिसेंबर रोजी गोंदिया येथे होणार आहे. या कार्यक्रमानंतर विधानसभा सीएम चषकाच्या विजेत्यांना पारितोषीक वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी आज(ता.२२) दिली. यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, भाजयुमो अध्यक्ष पंकज रहांगडाले, हंशू वानसीक, सुरेश कायरकर, बंटी पंचबुद्धे, भाऊराव उके आदी उपस्थित होते