
भंडारा,दि.16ः-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रमाचे माध्यमातून अनेक गावे स्वच्छ व सुंदर झालेली आहेत. स्वच्छतेची पहिली पायरी पूर्ण होवून शाश्वत स्वच्छतेच्या दिशेने झेप घेण्यात आली आहे. तरीही स्वच्छतेबाबत अनेक उपाययोजना करायच्या राहील्या आहेत. त्यात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापण हा विषय आहे. स्थानिक स्तरावर घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन करून शाश्वत स्वच्छतेचे चक्र पूर्ण करायचे आहे. याकरिता विविध क्षेत्रातील महिलांनी नाविण्यपूर्ण कल्पनांचा वापर करून स्वच्छतेचे कार्य अधिक तेज गतीने निरंतरपणे करीत राहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने स्वच्छ शक्ती दिवस कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ज्ञानेश्वर सपाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, विस्तार अधिकारी वर्मा उपस्थित होते. प्रास्ताविकात उप मुख्य कार्यकारी अधिकारी सपाटे यांनी, २0१२ च्या पायाभूत सर्वेक्षणात सुटलेल्या शौचालयाचे बांधकाम करण्यात बाबत आवाहन केले. सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी फुके यांनी जिल्ह्यातील स्वच्छतेच्या कार्याबाबत आपले अनुभव कथन केले.
यावेळी जिल्ह्यातील स्वच्छतेच्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करीत असलेल्या महिला सरपंच, महिला स्वच्छता गृही, बचतगटाच्या महिला, सामाजिक कार्यकर्त्या मिरा भट, अबाधा फाऊंडेशन तुमसर, हेल्पींग हॅण्ड फाऊंडेशन माडगी, असर फाऊंडेशन कलासंच, सरस्वती आदिवासी महिला गृप लोहारा तसेच पंचायत समितीस्तरावर कार्यरत पाणी व स्वच्छता केंद्राचे (कर्मचारी) गट समन्वयक व समूह समन्वयक यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप यांचे हस्ते स्वच्छ शक्ती पुरस्काराचे प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. संचालन व आभार माहिती शिक्षण संवाद सल्लगार राजेश येरणे यांनी मानले. जिल्हा कक्षाचे तज्ञ, सल्लागार यांनी कार्यक्रमाचे आयोजनासाठी सहकार्य केले.





