दूध उत्पादकांचे ११ कोटींचे चुकारे अडले-तारिक कुरेशी

0
32

भंडारा,दि.16ः-धान उत्पादक भंडारा जिल्ह्यात पूरक उद्योग म्हणून दुधाचे उत्पादन घेतले जाते. हे दूध जिल्हा दूध संघाला देण्यात येते. परंतु, मागील अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांचे तब्बल १0 कोटी ७९ लाख रुपयांचे चुकारे थकीत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे चुकारे देण्यास विलंब करणार्‍या जिल्हा दुग्ध संघाची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष तथा म्हाडाचे सभापती मो. तारीक कुरैशी, आ. चरण वाघमारे, आ. बाळा काशिवार, आ. रामचंद्र अवसरे यांनी शुक्र वारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी आ. वाघमारे म्हणाले, जिल्ह्यात दुधाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते. यातील बहुतांश दूध हे जिल्हा दुग्ध उत्पादक संघाला दिले जाते. दुग्ध संघ हे दूध विविध कंपन्यांना विकत असते. जिल्हा दुग्ध संघाकडे दररोज ७0 हजार ७0५ लिटर दूध संकलित होत असते. हे दूध अमूल, सुगंधी दूध, दुग्धजन्य पदार्थ व संघाच्या पाकीट विक्र ीसाठी दिले जाते. जिल्हा दुग्ध संघाकडे नियमित दूध येत असताना मागील अनेक महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांचे चुकारे संघाने दिले नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी संघाच्या कार्यालयात चकरा मारत असतात. आजपर्यंत संघाने १0 कोटी ७९ लाख ९५ हजार २७८ रुपयांचे चुकारे शेतकर्‍यांना दिलेले नाहीत. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे दुग्धविकास विभागाने जिल्हा दुग्ध संघाच्या कारभाराची तपासणी करावी व शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी भाजप आमदारांनी केली