गोंदिया,दि.28 : जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्यात यावी. यासाठी पालक व शालेय व्यवस्थापन समितीने अनेकदा शिक्षणाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र त्याची दखल घेतली जात नाही. पालक व शालेय व्यवस्थापन समितीने शाळेला कुलूप ठोकताच शिक्षकाची नियुक्ती केली जात आहे. त्यामुळे शाळेला कुलूप ठोका आणि शिक्षक मिळावा असेच चित्र जिल्ह्यात आहे.
गोरेगाव तालुक्यातील,कवडीटोला, कमरगाव येथील पालकांनी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन शिक्षकाच्या नियुक्तीसाठी शाळेला कुलूप ठोको आंदोलन सुरु केले आहे.शैक्षणिक सत्र संपायला आल्यानंतर सध्या शाळेला कुलूप ठोकण्याचे आंदोलन सुध्दा राजकारणच आहे की विद्यार्थ्यांची खरी चिंता पालक व शालेय व्यवस्थापन समितीला आहे.काल बुधवारी (दि.२७) कमरगाव येथील शाळेला कुलूप ठोकले गेले.तर मंगळवारला कवडीटोला येथील पालक पंचायत समितीवर धडकले.या दरम्यान गटशिक्षणाधिकारी महेंद्र लांडे यांनी शिक्षक नियुक्तीचे आश्वासन दिल्यानंतर शाळा पूर्ववत उघडण्यात आली.तर देवरी तालुक्यातील चिचगड येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका मनिषा रहागंडाले यांची चालू शैक्षणिक सत्रातच बदली केल्याने पालकांनी शाळेला मंगळवारी कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता.त्यावर जि.प.उपाध्यक्ष हामिद अल्ताप यांनी मध्यस्थी करीत दोन दिवस द्या शिक्षक मिळवून देतो असे आश्वासन दिल्यानंतर तेथीलही आंदोलन मागे घेण्यात आले होते.
त्याचप्रमाणे गोरेगाव तालुक्यात एकूण जिल्हा परिषदेच्या एकूण १०९ शाळा आहेत. यामध्ये १ हायस्कूल, ४८ वरिष्ठ प्राथमिक शाळा, ६० प्राथमिक शाळा आहेत. या शाळेत ४४६ शिक्षकांची गरज आहे. यापैकी २३ शिक्षकांची पदे भरलीे नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील दोन शाळांना पालक व शालेय व्यवस्थापन समितीने कुलूप ठोकल्यानंतर विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर बुधवारी (दि.२७) कमरगाव येथील पालक व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शिक्षकाच्या मागणीला घेवून शाळेला कुलूप ठोकले. गटशिक्षणाधीकारी महेंद्र लांडे यांना पालकांनी शाळेला कुलूप ठोकल्याची माहिती मिळताच त्यांनी भंडगा शाळेत कार्यरत शिक्षक सिध्दार्थ भोतमांगे यांची कमरगाव शाळेत नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पालकांनी आंदोलन मागे घेत शाळा पूर्ववत उघडली.कमरगांव वरिष्ठ प्राथमिक शाळेत १ ते ८ पर्यंत वर्ग असून १५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या शाळेत ५ शिक्षक कार्यरत आहेत.अजून एका शिक्षकाची गरज आहे. शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी अनेक दिवसांपासून पालक व शालेय व्यवस्थापन समितीने पंचायत समिती शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे पालकांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जाते.





