
साकोली,दि.04ःःनिवडणूक होऊन एक वर्षापर्यंत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी साकोली नगर परिषदेचे उपाध्यक्ष तरूण राजकुमार मल्लानी यांचे नगरसेवकपद रद्द केले आहे.
१९ डिसेंबर २0१६ रोजी साकोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात तरूण मल्लानी हे ओबीसीसाठी राखीव असलेल्या प्रभाग क्र . ६ मधून नगरसेवक म्हणून निवडून आले. मल्लानी हे क्षेत्रीय ओबीसी प्रवर्गात येतात. मल्लानी यांनी जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने हेमंत भारद्वाज यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज सादर करून त्यांना अपात्र ठरवावे, अशी मागणी केली होती. याविरोधात मल्लानी यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. आपला प्रस्ताव जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असल्याचे त्यांचे म्हणणे होते. याबाबत जिल्हाधिकार्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे आदेश नागपूर खंडपीठाने १0 सप्टेंबर २0१८ रोजी दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी १६ नोव्हेंबर २0१८ रोजी नगरविकास मंत्रालयाच्या उपसचिवांना योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला. हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने हेमंत भारद्वाज यांनी अँड. राम कारोडे यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तसेच मल्लानी यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी केली.
न्या. रवि देशपांडे व विनय जोशी यांच्या खंडपीठात मंगळवारी या याचिकेवर सुनावणी झाली. तरूण मल्लानी यांना अपात्र करण्यास जिल्हाधिकारी व उपसचिव टाळाटाळ करीत असल्याकडे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.




