– ग्रामपंचायतीचा ठराव मात्र काही गावकऱ्यांच्या छुपा विरोध
————————————-
गोरेगाव दि.29ः- तालुक्यातील घोटी गटग्रामपंचायत येथे बुधवारी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत घोटीला गोरेगाव नगरपंचायतीमध्ये समाविष्ठ कऱण्याचा निर्णय घेण्यात आला.ही ग्रामसभा ग्रामपंचायत पटांगणात घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभारी सरपंच संगिता कटरे होत्या.ग्रामसभेत घोटी गटग्रामपंचायतीला गोरेगाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्याचा ठराव घेण्यात आला. मात्र काही गावकऱ्यांच्या छुपा विरोध असल्याने व गोरेगाव नगरपंचायतीकडून घोटीला नगरपंचायतीमध्ये समावेश करावे अथवा नाही यावर अद्यापही शिक्कामोर्तब झाला नसल्याने घोटी ग्रामपंचायतीच्या गोरेगाव नगरपंचायती मध्ये समाविष्ट होणार अथवा नाही याविषयी चर्चांना पेव फुटले आहे
गोरेगाव तालुका मुख्यालयाला लागूनच घोटी हे गाव असून चार हजार ७५ एवढी लोकसंख्या आहे. तर घोटी, गहलाटोला,जानाटोला असे तीन गाव मिळून गट ग्रामपंचायत आहे. त्यातच ३४०० मतदार या तिन्ही गावात आहेत.त्याचबरोबर ग्राम पंचायत सदस्य संख्या ११ आहे विकास कामांचे नियोजन अभावी विकास साधला गेला नसल्याचा ठपका ठेवत ८४ ग्रामस्थानी १५ ऑगस्ट रोजी घोटी ग्रामपंचायतीला गोरेगाव नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली होती. यानुसार बुधवार 28 ऑगस्ट रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी
जिप सभापती विश्वजीत डोंगरे , ग्रामपंचायत सदस्य व २८० गावकरी उपस्थित होते. सर्वप्रथम घोटी गटग्रामपंचायतीला गोरेगाव नगर पंचायत येथे समाविष्ट करण्यात यावे किंवा समाविष्ट करु नये या संदर्भात पक्ष व विरोधात बोलण्यात यावे असे सभेचे अध्यक्ष प्रभारी सरपंच संगीता कटरे यांनी सांगितले, असता गोरेगाव नगर पंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी महाप्रसाद बिजेवार, रामदास पटले, बाबुलाल राऊत,वहाब बेग मिर्झा,कोमेस टेंभरे, रामलाल तुरकर यांनी आपले मत व्यक्त केले. तर विरोधात प्रेमसिह राठोड, देवानंद येरणे यांनी आपले मत मांडले सभेचे अध्यक्ष प्रभारी सरपंच संगीता कटरे यांनी समाविष्ट करण्यासाठी करु नये यासाठी एका बाजूला होण्याचे आदेश दिले असता विरोधात कोणीही रांग लावली नाही. त्यामुळे गोरेगाव नगर पंचायत मध्ये समाविष्ट करण्यात यावे असे ठराव घेण्यात आले .
विषेश म्हणजे, काही महिन्यांपूर्वी निष्क्रिय असल्याचा ठपका ठेवत येथील ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच जितेंद्र डोंगरे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव पारीत करून त्यांना पायउतार केले होते. तर सध्या उपसरपंच संगीता कटरे यांचेकडे सरपंच पदाचा प्रभार आहे. त्यातच आता पायउतार झालेले सरपंच व त्यांचे सहकारी यांनी उठाठेव केल्याच्या चर्चा गावात रंगू लागले आहेत. तेव्हाही त्या काळात घोटी ग्रामपंचायतीचा गोरेगाव नगरपंचायती मध्ये समावेश होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
सभा ग्रामपंचायत स्तरावरच
घोटी गाव चा समावेश गोरेगाव नगरपंचायत मध्ये करण्यासाठी ग्रामसभा किंवा विशेष सभा घेण्याचे कसलेच पत्र प्रशासनाकडून अथवा शासन स्तरावर ग्रामपंचायतीला देण्यात आले नव्हते दरम्यान गावकऱ्यांच्या यांच्या मागणीवरून या ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सरपंच संगीता कटरे यांनी ठरावावर नमूद केले.
पुढे काय होणार?
काही जाणकारांच्या मते एखाद्या गावाचे समावेश नगरपंचायत अथवा वेगळी ग्रामपंचायत निर्मिती करावयाची असल्यास त्या गावातील मतदार संख्येच्या 50% नागरिकांची उपस्थिती ग्रामसभेला गरजेचे असते त्यातच घोटी ग्रामपंचायत अंतर्गत 3400 मतदार लोकसंख्या असून बुधवारी घेण्यात आलेल्या विशेष सभेत मतदार लोकसंख्येच्या केवळ 280 म्हणजेच नऊ टक्के ग्रामस्थ या विशेष सभेला उपस्थित होते तर अनेकांनी नगरपंचायतीला गाव देण्याच्या विरोध असल्याकारणामुळे ग्रामसभेला उपस्थित झाले नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याचबरोबर घोटी ग्रामपंचायतीला नगरपंचायत मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात गोरेगाव नगरपंचायत इकडून अद्यापही ठराव घेण्यात आलेला नसल्याची माहिती असून घोटी ग्रामपंचायतीच्या गोरेगाव नगरपंचायत मध्ये समावेश होणार अथवा नाही याविषयी सध्यातरी संभ्रम आहे.
घोटी ग्रामपंचायतीच्या समावेश नगरपंचायत मध्ये झाल्यास घोटी जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती क्षेत्र असून यासंदर्भात या क्षेत्रा चे जि प सदस्य व गोंदिया जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांना विचारणा केली असता त्यांनी गावकरी जे निर्णय घेतील आपल्याला मान्य असणार असल्याचे सांगितले





