भंडारा दि 26:- महाराष्ट्र विधान सभा निवडणूकांमध्ये काळया पैशाच्या वापरावर प्रतिबंध आणण्यासाठी निवडणूक आयोगाने आयकर विभागाच्या अन्वेशन संचालनालयाच्या सुविधांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने नागपूर विभागीय अन्वेशन विभाग सज्ज असून त्यांच्या कार्यालयात 24×7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीत रोख रक्कम आणि अन्य प्रकारच्या मौल्यवान वस्तु पकडण्याची जबाबदारी आयकर विभागाकडे दिली आहे. रकमेचे वाटप आणि कुणी रोख वाहनातून घेवून जात असेल या माहितीच्या आधारे त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. रोख आणि इतर मौल्यवान वस्तुंच्या देवाण-घेवाणीवर राज्य आणि इतर केंद्रीय विभागाच्या समन्वयाने तसेच आयकर विभागात स्वत:च्या अधिकारात बारीक लक्ष ठेवून आहे. काळया पैशावर नजर ठेवण्यासाठी विदर्भातील 11 जिल्हयांमध्ये 11 शिघ्र कृतीदल स्थापन केले आहे. प्रत्येक दलात आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त, दोन वरिष्ठ अधिकारी, तीन निरिक्षक सहभागी आहेत.
याशिवाय काळया पैशाबाबत माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1800-2333785 या क्रमांकावर तसेच 9403391664 या भ्रमणध्वनीवर वॉटस्अपद्वारे तक्रार देवू शकतो. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी आणि निवडणूकी दरम्यान काळया पैशाचा वापर टाळण्यासाठी सामान्य नागरिकांनी पुढे येवून काळा पैसा, रोख, सोने व चांदी, इतर मौल्यवान वस्तु साठवणूक तसेच वाटप याची माहिती टोल फ्री क्रमांकावर माहिती दयावी, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.




