29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home राजकीय पवार साहेबांचे नाव शिखर बँक घोट्याळ्यात गोवल्याने आपल्याला मानसिक त्रास-अजित पवार

पवार साहेबांचे नाव शिखर बँक घोट्याळ्यात गोवल्याने आपल्याला मानसिक त्रास-अजित पवार

0
29

मुंबई,दि.28(वृत्तसंस्था) -माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते 19 तास अज्ञातवासात होते. यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.तत्पूर्वी सिल्व्हर ओक येथे त्यांची शरद पवार, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पवार यांनी भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याबद्दल खुलासा केला आहे. गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या राजानाम्याचे गुढ अजित पवारांच्या तोंडूनच उलगडले आहे.12हजार कोटीच्या ठेवी असलेल्या शिखर बँकेत 25 हजार कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका आणि त्यात पवार साहेबांचे आलेले नाव आपल्या विवेकबुध्दीला कुठेच पटले नाही,या सर्व गोंधळात आपण विचलीत होतो आणि येथून कुठेतरी मार्ग काढायला हवा म्हणून आमदारकीचा राजीनामा कुणालाही न विचारता दिल्याचे म्हणाले.पत्रपरिषदेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,दिलीप वळसे पाटील,छगन भुजबळ,जितेंद्र आव्हाड आदी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

अचानक राजीनामा दिल्यामुळे पक्षातील सर्वांनाच वेदना झाल्या, गोंधळ उडाला. ही माझी चूक होती की नव्हती हे मला माहिती नाही. पण, मी सर्वांची, कार्यकर्त्यांचीही माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच यापूर्वीच्याही एका राजीनामा प्रसंगाची आठवण अजित पवार यांनी करून दिली. तब्बल दीड तास पवार कुटुंबीयाची चर्चा सुरू होती. त्यानंतर अजित पवारांनी बाहेर येताच माझी भूमिका धनंजय मुंडे स्पष्ट करतील, असे सांगूत ते निघून गेले. तर दुसरीकडे, आमच्या कुटुंबात आईपासून एक पद्धत आहे. सर्व कुटुंबीय मिळून चर्चा करतात. ती चर्चा फक्त राजकीय होती असे नाही, काही कौटुंबिक चर्चाही होत असतात. चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही, अजित पवार पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील. सहकाऱ्यांशी बोलून ते अंतिम निर्णय घेतील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर, अजित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यावर मौन सोडले आहे. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान अजित पवारांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना राजीनामा मेल केला. त्यानंतर, अध्यक्ष बागडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधून ‘‘आपल्याकडे मी राजीनामा दिलेला आहे, तो स्वीकारावा,’’ अशी विनंती केली. बागडे यांनी पत्रकारांना सांगितले की, योग्य फॉरमॅटमध्ये अजित पवार यांनी राजीनाम्याचे पत्र दिल्याने मी तो स्वीकारला. याबाबतचे वृत्त मीडियात येताच, राज्यात खळबळ उडाली होती. अनेकांनी अजित पवारांचा राजीनामा हे गृहकलह असल्याचे मत व्यक्त केले होते. तर, शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होऊन अजित पवारांनी राजीनामा दिला, असे पार्थ यांनी शरद पवारांना सांगितले होते, ते पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.शिखर बँकेत एकटे अजित पवार नाही तर भाजप शिवसेनेचेही संचालक होते परंतु सरकार पवार कुटुबियांनाच बदनाम करीत आहे.त्यातच निवडणुकीच्या काळातच हा प्रकार का आला असे म्हणत सिंचन घोट्याळ्यात 70 हजार कोटीचा आरोप करण्यात आला,अद्याप त्याची चौकशी नाही का होत नाही निवडणुकीच्या वेळीच असे आरोप का करतात हा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.