40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय काँग्रेस आमदार काशिराम पावरा, गोपीचंद पडळकर यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस आमदार काशिराम पावरा, गोपीचंद पडळकर यांचा भाजपात प्रवेश

0
37

blank

मुंबई,दि.30ः-धनगर समाजाचे नेते असलेले गोपीचंद पडळकर यांना बारामती मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा विचार करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. शिरपूरचे (जि. धुळे) काँग्रेसचे आमदार काशिराम पावरा, गोपीचंद पडळकर आणि शिरपूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशानिमित्ताने आयोजीत कार्यक्रमात मुख्यमंत्री मा. फडणवीस बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकातदादा पाटील होते.

यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार, कामगारमंत्री डॉ. संजय कुटे, कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष किरिट सोमय्या आणि आ. प्रसाद लाड तसेच आ. राज पुरोहीत उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, गोपीचंद पडळकर यांनी स्वत:साठी कोणतेही पद न मागता भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पडळकर हे लढाऊ कार्यकर्ते असून त्यांच्या सारख्या कार्यकर्त्यांचा योग्य तो मान राखला जाईल. पडळकर यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याबाबतचा प्रस्ताव आपण भाजपा नेतृत्वाकडे मांडू.

प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, दिवसेंदिवस भाजपाची लोकप्रियता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरचा सामान्य जनतेचा विश्वास वाढतच आहे. गोपीचंद पडळकर हे काही काळ भाजपापासून दुरावले होते. मात्र, ते आता पक्षात परतले आहेत याचा आनंद आहे.गोपीचंद पडळकर म्हणाले की, संपुर्ण जगात भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ देणे हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचे काम आहे. या विचारानेच आम्ही भाजपात परतलो आहोत.काशिराम पावरा म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यांच्या योजनांना साथ देण्यासाठी आम्ही काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

blank