29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ मतदार जागृतीसाठी माहिती पुस्तिकेचे वाटप

मतदार जागृतीसाठी माहिती पुस्तिकेचे वाटप

0
56
  • मतदार चिठ्ठी वितरणाचे कामही अंतिम टप्प्यात

वाशिम, दि. १४ : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ‘स्वीप’चे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग अर्थात ‘स्वीप’ अंतर्गत जिल्ह्यात २ लाख ९४ हजार ९०० कुटुंबांना रंगीत मतदार माहिती पुस्तिकेचे वितरण करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त झालेल्या या माहिती पुस्तिका मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) प्रत्येक कुटुंबांपर्यंत पोहोचविण्याची कार्यवाही सुरु झाली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी दिली.

मतदार नोंदणीपासून ते प्रत्यक्ष मतदान करण्यापर्यंतच्या विविध टप्प्यांची माहिती या मतदार माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. मतदानादिवशी मतदान केंद्रांवर कोणत्या वस्तू घेवून जाण्यास मनाई आहे, मतदानासाठी कोणते ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल, तसेच मतदानादिवशी मतदान केंद्रातील प्रक्रियेची सचित्र माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्याचबरोबर मतदान केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहितीही यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये एक माहिती पुस्तिका वितरीत केली जाणार असून मतदारांसाठी अतिशय उपयुक्त माहिती यामध्ये असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

सर्व मतदारांना मिळणार मतदार चिठ्ठी

मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असलेल्या सर्व मतदारांना मतदार चिठ्ठीचे वितरण बीएलओ मार्फत गतीने सुरु आहे. संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीच्या कोणत्या भाग क्रमांकात आहे, त्याचा अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव आदी माहिती या मतदार चिठ्ठीमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे मतदारांना आपल्या मतदान केंद्रांची अचूक माहिती मिळणार असून मतदान करणे सुलभ होईल.

१४ हजार ४५२ मतदार ओळखपत्रांचे वितरण

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर मतदार यादीमध्ये नाव नोंदविलेल्या मतदारांपैकी १४ हजार ४५२ मतदारांची मतदार ओळखपत्रे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही सर्व ओळखपत्रे वितरणासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना पाठविण्यात आली होती. त्यापैकी आजपर्यंत १३ हजार ४५५ मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले असून उर्वरित ओळखपत्रांचे वितरण अंतिम टप्प्यात आहे.