- ६ हजार ६९४ टपाली मतपत्रिकांचे वितरण
वाशिम, दि. १४ : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये २१ ऑक्टोंबर २०१९ रोजी मतदान होत आहे. मतदान केंद्रांवर नियुक्त करण्यात आलेले अधिकारी, पोलीस तसेच मतदानादिवशी इतर कर्तव्यावर नियुक्त अधिकाऱ्यांना टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात ६ हजार ६९४ टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले आहे. टपाली मतदान करणाऱ्या मतदारांसाठी तिन्ही विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात विशेष सुविधा कक्ष सुरु करण्यात आला आहे. तसेच टपाली मतपत्रिकेसोबत द्यावयाचे स्वयंघोषणा पत्र साक्षांकित करण्यासाठी या सुविधा केंद्रांमध्ये राजपत्रित अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
टपाली मतदान करणारे मतदार तीन पैकी कोणत्याही एका निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सुविधा केंद्रात जावून आपले मत नोंदवू शकतात. टपाली मतदान केल्यानंतर सदर मतपत्रिकेचा बंद लिफाफा संबंधित मतदाराचे मतदान ज्या मतदारसंघात आहे, त्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचविण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमण्यात आले आहेत. १० ऑक्टोंबर पासूनच हे कक्ष कार्यान्वित झाले आहेत. जिल्ह्यात रिसोड विधानसभा मतदारसंघात २ हजार १५३, वाशिम विधानसभा मतदारसंघात २ हजार ६५२ आणि कारंजा मतदारसंघातील १ हजार ८८९ मतदारांना टपाली मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. टपाली मतपत्रिका मिळालेल्या मतदारांनी आपल्या नजीकच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अथवा जेथे निवडणूक प्रशिक्षण घेत आहात, तेथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील सुविधा केंद्रात जावून आपले टपाली मतदान करावे, असे आवाहन निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.




