
गोंदिया,दि.17- 66 आमगाव-देवरी विधानसभेचा निवडणुक प्रचार शिगेला पोचला असताना आज गुरूवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास स्थानिक प्रभाग क्र.14 मध्ये दोन राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचाराच्या मुद्यावरून चांगलीच जुंपल्याची चर्चा देवरी शहरात पसरली आहे. दरम्यान, भाजपचा कार्यकर्ता असलेल्या त्या नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्याने कॉंग्रेसच्या प्रचारकाचे कॉलर पकडल्याने चांगलाच वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
आमगाव-देवरी विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. सर्वच उमेदवारांच्या प्रचाराने वेग घेतला असला तरी प्रमुख राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांच्या हायटेक प्रचाराने परिसरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उल्लेखनीय म्हणजे यावेळी या मतदारसंघात ‘मुकद्दर का सिकंदर’ चित्रपटातील अभिनेता अभिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखावर चित्रित गाण्याने चांगलाच कहर करीत उत्तम रेटींग मिळवली आहे. प्रचारात प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याची संधी कोणीही सोडताना दिसत नाही. दरम्यान, आज देवरी नगरपंचायतीचा पदाधिकारी असलेल्या एका भाजप कार्यकर्त्याने प्रचारात आमच्या उमेदवाराचा नाव का घेतोस असे म्हणत कॉंग्रेस पक्षाचा प्रचार करीत असलेल्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करीत त्याची कॉलर पकडल्याची चर्चा शहरात पसरली आहे. या दोन्हीच्या भांडणाने देवरीच्या मतदारांची चांगली करमणूक झाल्याचे बोलले जात आहे.




