28.4 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ महत्वपूर्ण मतदान केन्द्रावर सुक्ष्म निरीक्षक ठेवणार नजर

महत्वपूर्ण मतदान केन्द्रावर सुक्ष्म निरीक्षक ठेवणार नजर

0
24

गोंदिया,दि.18: येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. राज्याचा टोकावर असलेला व  नक्षलदृष्टया संवेदनशील जिल्हा म्हणून गोंदिया ओळखला जातो. जिल्हयातील  महत्वाच्या मतदान केन्द्रावर अत्यंत बारकाईने नजर ठेवण्यासाठी सुक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे प्रशिक्षण 6 व 16 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात संपन्न झाले.

या प्रशिक्षणात सुक्ष्म निरीक्षकांना मतदान केन्द्रातील विविध प्रक्रियेसंदर्भात माहिती देण्यात आली. गोंदियाचे तहसीलदार राजेश भांडारकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ई.व्ही.एम., व्ही.व्ही. पॅट संदर्भात  माहिती दिली. तसेच मशीन हाताळण्याचे प्रात्याक्षिक सुक्ष्म निरीक्षकांना दाखवुन त्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, सामान्य  निवडणूक निरीक्षक  मंजूर अली, राजीव मेहता, शौकत अहमद परे, धनंजयसिंग भदोरीया,जि. प. मुख्य कार्यकारी  अधिकारी डॉ. राजा दयानिधी, सहायक जिल्हाधिकारी रोहन घुगे प्रामुख्याने  उपस्थित होते.

जिल्हयातील महत्वाचे मतदान केन्द्र ज्याठिकाणी 5 किंवा त्यापेक्षा जास्त बुथ असल्यास सुक्ष्म निरीक्षक यांच्या देखरेखीमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येईल. जिल्हयातील तिरोडा, गोंदिया व  आमगाव या तीन मतदारसंघातील एकुण 22 मतदान केंद्राच्या इमारतीत 22 सुक्ष्म निरीक्षक मतदान प्रक्रीयेच्या वेळेस उपस्थित राहणार आहेत. तिरोडा मतदारसंघातील 1 मतदान केन्द्रावर  1 सुक्ष्म निरीक्षक, गोंदिया मतदारसंघातील 19 मतदान केन्द्रावर 19 सुक्ष्म निरीक्षक व आमगाव मतदारसंघातील 2 मतदान केन्द्रावर 2 सुक्ष्म निरीक्षक उपस्थित राहणार आहेत.  4 सुक्ष्म निरीक्षक यांना राखीव ठेवण्यात आले आहे.