36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ आज प्रचार संपणार आमगाव व अर्जुनी / मोरगावमध्ये 3 वाजतापर्यंतच

आज प्रचार संपणार आमगाव व अर्जुनी / मोरगावमध्ये 3 वाजतापर्यंतच

0
80

blank

 गोंदिया व तिरोडात 6 वाजेपर्यंत प्रचार

* मतदान केंद्राच्या परिसरात मनाई आदेश

* बाहेरच्या प्रचारकांना जिल्ह्यात राहण्यास मनाई

* मध्य विक्रीची दुकाने 48 तासापूर्वीपासून बंद राहणार

गोंदिया दि.19 _विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येथे 21 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही मतदारसंघात मतदान होणार आहे. आज 19 ऑक्टोंबर रोजी सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार थांबणार आहे. अर्जुनी / मोरगाव आणि आमगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजतापर्यंत आहे. त्यामुळे या मतदारसंघातील प्रचार आज 19 ऑक्टोंबर रोजी  दुपारी 3 वाजताच संपणार आहे. गोंदिया आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघातील मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील प्रचार आज सायंकाळी 6 वाजतापर्यंत संपणार आहे

निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे, निवडणूक खर्च विषयक बाबी तसेच रोख रक्कम, दारू किंवा लाचेची कोणतीही वस्तू देणे व त्यावर आळा घालण्यासाठी निवडणूक विभागाचे भरारी पथके,स्थिर सनियंत्रण पथके यांना सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. बलकवडे यांनी दिले असून प्रचार बंद असलेल्या कालावधीत ही पथके 24 तास कार्यरत राहणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 द्वारे मनाई आदेश जारी केले आहे. त्यानुसार मतदान केंद्राच्या 200 मीटर व 100 मीटर परिसरामध्ये कुठलीही प्रतिबंधित कृती करण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमातील कलम 126 अंतर्गत मतदान संपण्यापूर्वी 48 तासांमध्ये प्रचार बंदी असल्यामुळे मतदारसंघातील मतदार नसलेले सर्व राजकीय पदाधिकारी,पक्ष कार्यकर्ते, प्रचाराची धुरा सांभाळणारे सर्व व्यक्ती तसेच स्टार प्रचारक यांना जिल्ह्याच्या सीमेत राहण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील ठोक व किरकोळ देशी अथवा विदेशी मद्य विक्री करणारे परवानाधारक दुकाने  मतदान संपण्याच्या 48 तास पूर्वी या कालावधीत तसेच मतमोजणीच्या दिवशी 24 ऑक्टोबरला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. आदेशाचे उल्लंघन करून मद्य विक्री केल्याचे आढळून आल्यास परवाने रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे.

50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम नेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोबत नेत असल्याचे आधार देणारे पुरावे म्हणून कागदपत्रे सोबत बाळगावे लागणार आहे. तसेच मतदारांना लाच देणे किंवा धमकी देणे धाकदपटशाही करणे हा केवळ निवडणूक अपराध नसुन  भारतीय दंड संहिता अन्वये सुद्धा दंडनिय आहे. म्हणून प्रत्येकाने अशा कृतीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. स्वयंसहायता समूह किंवा अशा संस्थांना सार्वजनिक राज्य कोषातून रोख किंवा धनादेशाद्वारे कोणतेही प्रदान वितरित न करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहे.

मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी भेट वस्तूंचे / सामाजिक सभागृहामध्ये मोफत भोजन देणे इत्यादी तपासणीसाठी मंगल कार्यालय / सभागृहे व लॉन यांच्या आरक्षणाची यादी प्राप्त करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना सुचना देण्यात आल्या आहे. मतदान केंद्रापर्यंत येण्यासाठी आणि तिथून जाण्यासाठी उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी मतदारांना मोफत वाहन उपलब्ध करून देणे ही चुकीची कृती करू नये.

blank