29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर १३ लाखांची थकबाकी

सोंड्याटोला सिंचन प्रकल्पावर १३ लाखांची थकबाकी

0
41

तुमसर,दि.04ःमहत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावर वीज वितरण कंपनीचे १३ लाखांची थकबाकी असणारे विजेचे बिल धडकले आहे. यासोबत वीजपुरवठा खंडीत करणारे अल्टीमेटम असलेले नोटीस दिले असले तरी वीज पुरवठा खंडीत होणार नाही, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
सिहोरा परिसरात असणार्‍या महत्त्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात नदीपात्रातून पाण्याचा उपसा उशिरा सुरू करण्यात आलेला आहे. निरंतर प्रकल्पस्थळात महिनाभर पाण्याचा उपसा करण्यात आल्याने चांदपूर जलाशयाचे ओव्हरफ्लोपर्यंत मजल मारली आहे. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक झाले असल्याने या पाण्याचा फायदा चांदपूर जलाशयाला झाला आहे. प्रकल्पस्थळात शुक्रवारपासून ६ पंपगृहाचे पाण्याचा उपसा सुरू ठेवण्यात आलेला आहे. जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर प्रकल्पस्थळात उपसा बंद करण्यात आलेला होता. परंतु, बावनथडी नदीपात्रात पाणी असल्याने उपसा करण्यासाठी लगबग असताना पर्याय दिसून आला नाही. सप्टेंबर महिन्यात वीज वितरण कंपनीने १0 लाख ४७ हजार ८१0 रुपयांचे प्रकल्पात विज बिल दिले. परंतु, वीज पुरवठा खंडीत करण्यात आले नसल्याने प्रकल्पाचे चांगलेच फावले. अलिकडे खरिप हंगामातील धानाची लागवडीला सिंचनाकरिता चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्यात आले आहे. शेतशिवारात शेतकर्‍यांना ‘बिन मांगे मोती मिले’असे चित्र निर्माण झाल्याने कुण्या शेतकर्‍याने पाण्यासाठी ओरड केली नाही. यंदा नाल्यात वाहून जाणार्‍या शेतशिवारातील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यात आले. यामुळे पाण्याचा अपव्यय थांबविण्यात मोठी मदत मिळाली आहे. दरम्यान, नुकतेच ऑक्टोंबर महिन्यात तीन महिन्यांचे १३ लाख रुपयांचे वीज बिल धडकले आहे. या सोबत अल्टीमेटम असणारे नोटीस वीज वितरण कंपनीमार्फत देण्यात आले आहे. पाटबंधारे विभाग शाखा सिहोरामार्फत तिरोडा उपसा सिंचन प्रकल्पामुळे वीज बिल आणि नोटीस पाठविण्यात आले आहे. खरिप हंगामात पाणी वाटप करण्यात आल्याने जलाशयात ३२ फुट पाणी शिल्लक आहे. याशिवाय नदीपात्रात पाणी असल्याने तीन पंपगृहाने पाण्याचा उपसा केला जाणार आहे. जलाशयात यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पाण्याची साठवणूक असल्याने उन्हाळी धान पिकाचे क्षेत्र पाणी वाटपात वाढविण्याची मागणी होणार आहे. रोटेशन पद्धतीनुसार पाणी वाटप केले जात आहे. परंतु, यंदा क्षेत्र वाढविण्याकरिता दबाव वाढण्याची शक्यता आहे. याकरिता मागणी होण्यास सुरूवात झाली आहे.