39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ अधिसूचित सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्विकारावे – स्वाधिन क्षत्रिय

अधिसूचित सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्विकारावे – स्वाधिन क्षत्रिय

0
33

Ø  सेवा हमी हक्क कायदयाची जागृती करा

Ø  विहित वेळेत सेवा देणे आवश्यक

          भंडारादि. 6 :- शासनाच्या विविध विभागाच्या सेवा विहित मुदतीत नागरिकांना देण्यासाठी लोकसेवा हमी हक्क कायदा  राज्यात लागू केला असून या कायदयांतर्गत अधिसूचित केलेल्या 486 सेवा नागरिकांना देण्यासाठी सर्व सेतू केंद्रावर अधिसूचित सेवांचे अर्ज स्विकारण्यात यावेत, अशा सूचना मुख्य लोकसेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय यांनी दिल्या. अधिसूचित केलेल्या 486 सेवांपैकी 398 सेवा ऑनलाईन असून उर्वरित सेवा ऑफलाईन आहेत. ऑफलाईन सेवा लवकरच ऑनलाईन करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. आज भंडारा जिल्हा दौऱ्यावर आले असता क्षत्रिय यांनी सेतू सेवा केंद्र, तहसिल कार्यालय भंडारा, उपविभागीय कार्यालय भंडारा, नगर परिषद, भूमि अभिलेख कार्यालय, ग्रामपंचायत गणेशपूर व जिल्हा परिषदेला भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत  ते बोलत होते.जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीप चंद्रन, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, मनिषा कुरसंगे, अधिक्षक भूमी अभिलेख एम.बी. पाटील, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लोकसेवा हक्क कायदा प्रभावी अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी स्वाधिन क्षत्रिय यांनी आज भंडारा जिल्हयाचा दौरा केला. प्रशासकीय इमारत येथील सेतू सेवा केंद्राला भेट देवून ऑनलाईन सेवा केंद्राची पाहणी त्यांनी केली. यावेळी सेवा केंद्रावर आलेल्या नागरिकांशी संवाद साधला. क्षत्रिय यांनी स्वत: सेतू केंद्रात जावून नागरिकांना विहित मुदतीत देण्यात येणाऱ्या सेवांची पाहणी केली. यानंतर नगर पालिका कार्यालयास भेट देवून पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेतला. भूमी अभिलेख कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवांबाबत माहिती जाणून घेतली.ग्रामपंचायत गणेशपूर येथे भेट देवून क्षत्रिय यांनी ग्रामपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांचा आढावा घेतला. गणेशपूर ग्रामपंचायत मार्फत सर्व अधिसूचित सेवांचे अर्ज स्विकारण्याची व्यवस्था सेतू केंद्रात करण्यात आली आहे. या कार्याबाबत नागरिकात व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. जिल्हा परिषद येथे विविध विभाग प्रमुखांशी क्षत्रिय यांनी चर्चा केली. जिल्हा परिषदेच्या विविध कार्यक्रमात तसेच मेळाव्यात सेवा हक्क हमी कायदयाची माहिती नागरिकांना दयावी, असे ते म्हणाले.

अधिसूचित केलेल्या 486 सेवांची माहिती जिल्हयाच्या तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दयावी. या सेवांपैकी महत्वाच्या तसेच वारंवार मागणी होणाऱ्या 20 सेवांची यादी सेतू केंद्रावर प्रसिध्द करावी. सर्व सेवांचे अर्ज सेतू केंद्रावर स्विकारावे, असा शासन निर्णय नगर विकास खात्याने निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सेवा हक्क हमी कायदयाची सेवा मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागरिकांनी सेवेसाठी ऑनलाईन अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज केल्यास आपल्या अर्जाची सद्यस्थिती पाहण्याची सोय संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. नागरिकांना विहित मुदतीत सेवा देणारा हा कायदा अतिशय उपयुक्त असून या कायदयांतर्गत निर्धारित वेळेत सेवा दिल्यास नागरिक माहिती अधिकारात माहिती विचारणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. सेवा हमी हक्क कायदयाची काटेकोर अंमलबजावणी सोबतच या कायदयाची जनजागृती मोठया प्रमाणात करावी, जेणेकरुन नागरिकांनी विहित कालावधीत सर्व सेवा प्राप्त होतील व कायदा करण्याचा उद्देश सफल होईल, असे ते म्हणाले.