
पवनी,दि.08ः-येथील बाजार समितीमध्ये देण्यात येणार्या धान्य खरेदीची टोकण मिळावी याकरिता शेतकर्यांची गर्दी वाढली असून, गर्दीत रांगेत उभे राहून त्रस्त झालेल्या शेतकर्यांनी शक्कल लढवीत चक्क पायातील चप्पलांना रांगेत उभे केले. अवकाळी पावसाने जेरीस आलेल्या शेतकर्यांना धान विकण्यासाठी बाजार समितीतील अव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे.
शासनाचे आधारभूत धान्य खरेदी केंद्राचे उद््घाटन नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे हस्ते बुधवारी े(ता.६) दुपारी २ वाजता खरेदी विक्री सहकारी संस्था पवनीचे सभापती माणिकराव ब्राह्मणकर व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. या कार्यक्रमाला शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. धान्य खरेदी केंद्राचे उद््घाटन शेतकर्याचे धान्य मोजून करण्यात आले. मात्र, उपस्थित शेतकर्यांना त्याच वेळेस टोकण न दिल्याने शेतकर्यांमध्ये नाराजीचा सूर होता. त्यामुळे आपले धान लवकरात लवकर मोजल्या जाऊन मिळणारा मोबदला लवकर मिळावा याकरिता परिसरातील शेतकरी टोकण मिळविण्यासाठी रात्री १0 वाजतापासूनच बाजार समितीच्या आवारात दाखल झाले. संपूर्ण रात्र त्यांना तिथेच काढावी लागली.
शेतकर्यांना रात्रीला थांबण्याकरिता बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती तर आज गुरुवारी सकाळी सर्व शेतकरी उन्हात उभे होते. बाजार समितीकडून मंडप सुद्धा टाकण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवात बाजार समिती व खरेदी विक्री या दोन्ही समितीचे विरोधात रोष व्यक्त केला.
शेतकर्यांना सोयीचे होईल याकरीता टोकण देणार्या टेबलांची संख्या वाढविण्यात यावी, पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, धान्य मोजणीची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात यावी तसेच तालुक्यात फक्त पाच धान्य खरेदी केंद्र असल्याने प्रत्येक केंद्रावर १५-२0 गावे जोडली केल्याने शेतकर्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे केंद्राची संख्या वाढविण्यात यावी, अशा मागण्या शेतकर्यांनी केल्या आहेत.




