भंडारा,दि.08ः जवाहर नवोदय विद्यालयासंबंधी विविध विषयांना घेऊन ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने खा. सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत जून महिन्यात एक विस्तृत बैठक घेतली होती. त्याचाच पाठपुरावा म्हणून आज, गुरुवारी खा. मेंढे यांनी पुन्हा एकदा नवोदय विद्यालायला भेट देऊन तेथील निमार्णाधीन असलेल्या नवोदयच्या इमारत परिसरातील कामांची पाहणी केली तसेच संबंधित अधिकार्यांना निर्देश दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामराव कारेमोरे, सरपंचा सीमा राहंगडाले, मुख्याध्यापक टेंभूर्णीकर, सहाय्यक शिक्षक गायकवाड व ग्रामवासी उपस्थित होते. मागील वेळेच्या आढावा बैठकीतील बर्याच मुद्यांवर समाधानकारक काम सुरु आहे. असेम्ब्ली ग्राऊंड, मुलांची निवासव्यवस्था, भोजनकक्ष या सर्व ठिकाणी भेट देऊन तेथील कामांच्या पूर्ततेसाठी बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना सूचना त्यांनी दिल्या. तसेच पाण्याच्या समस्या सोडविण्यासाठी १८ लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यामुळे पाण्याची समस्या देखील दूर होणार आहे, अशी माहिती खासदार मेंढे यांनी या भेटीनंतर बोलताना दिली. दरम्यान, शाळा परिसरात अजून देखील मुक्कामी असणार्या ३ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी संबंधित अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून पर्याय उपलब्ध करून देण्याची सूचना केली असल्याचे खा. मेंढे पुढे म्हणाले.





