42.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय मुख्यमंत्री फडणवीस घेणार साडेचार वाजता पत्रकार परिषद

मुख्यमंत्री फडणवीस घेणार साडेचार वाजता पत्रकार परिषद

0
44

blank

मुंबई,दि.8(विशेष प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार संपुष्टात येण्यासाठी 20 तास उरलेले असताना आज सायंकाळी 4.30 वाजता वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त हाती आले आहे.तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे रंगशारदामध्ये आमदारांची भेट घेणार असल्याचे सुनिल प्रभू यांनी सांगितले.युतीला बहुमत मिळालेले असताना शिवसेनेने 50-50 टक्के सत्तेत हिस्सा मागितल्याने निकाल लागून 15 दिवस उलटत आले तरीही सत्ता स्थापनेत भाजपाला अपयश आले आहे. यामुळे आजचा दिवस महत्वाचा मानला जात आहे. भाजपाचे नेते आणि मंत्री आशिष शेलार राजभवनामध्ये पोहेचले असून भाजपाचे अन्य नेतेही तेथे जाण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देण्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी बोलताना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद अशी काही चर्चा झालीच नव्हती असे वक्तव्य केले होते. तिथूनच भाजपा आणि शिवसेनाचा वाद सुरु झाला. हे वक्तव्य मागे घेण्यासाठी एक ड्राफ्ट तयार होत आहे असे वृत्त येत आहे. याच वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले जाईल आणि जो दोन पक्षांमध्ये तिढा निर्माण झाला आहे तो सोडवण्यासाठी या वाटाघाटी सुरु असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

राज्यातील १३ व्या विधानसभेचा कार्यकाळ शनिवारी ९ नोव्हेंबरला संपत आहे. विधानसभा बरखास्त होत असताना राज्यातील सरकारचा कार्यकाळही संपुष्टात येतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. विधानसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यपाल सरकार स्थापन करण्यासाठी प्रक्रिया सुरु करतील. सर्वात आधी ते सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तेचं निमंत्रण देऊ शकतात. भाजपाकडे १०५ आमदारांचे संख्याबळ आहे तर शिवसेनेकडे ५६ आमदारांचे संख्याबळ आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणुका एकत्र लढल्या होत्या. महायुतीकडे बहुमताचा १४५ आकडा आहे. पण मुख्यमंत्रिपद समसमान वाटप व्हावं या मागणीवर शिवसेना ठाम आहे तर मुख्यमंत्रिपद सोडणार नसल्याची भूमिका भाजपाने घेतली आहे.

blank