28.2 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home राजकीय भाजप सत्ता स्थापनेस अपयशी ठरल्यास शिवसेना प्रयत्न करणार! राउत

भाजप सत्ता स्थापनेस अपयशी ठरल्यास शिवसेना प्रयत्न करणार! राउत

0
46

मुंबई(वृत्तसंस्था)दि.10 – भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलावले आहे. परंतु, त्यांच्याकडे बहुमत असेल तर शिवसेनेकडून शुभेच्छा असा टोला संजय राउत यांनी लावला आहे. भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापित करण्यासाठी बहुमताची परीक्षा द्यावी लागेल. भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यास शिवसेना आपले पुढचे धोरण स्पष्ट करणार असेही शिवसेनेचे खासदार संजय राउत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

सध्याच्या परिस्थितीमध्ये आमदार फोडण्याची हिंमत कुणीही करू शकणार नाही. आम्ही कुणालाही फोडू शकतो, बहुमत खरेदी करू शकतो असे समजणाऱ्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. फोडाफोडीचे प्रयत्न झाले. मात्र प्रयत्न करूनही इच्छित साध्य न झाल्याने सगळे शांत झाले असा टोला संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान,  राज्यपालांनी भाजपाला दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांची आज दुपारी 12.30 मालाडमधील रिट्रीट हॉटेमध्ये महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेसुद्धा उपस्थित राहतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक

शिवसेना सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असेल तर त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळवणे आवश्यक आहे. अशात संजय राउत यांनी त्याबाबत संकेतही दिले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे कौतुक करत असताना त्यांचे आमदार सुद्धा फुटणार नाहीत असा दावा संजय राउत यांनी केला. सोबतच, शिवसेनेची बेळगाव सीमा प्रश्नी जी भूमिका आहे, त्यावर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे एकमत आहे असेही राउत म्हणाले आहेत.

काँग्रेस देणार शिवसेनेला पाठिंबा!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून शिवसेना पक्षाला पाठिंबा देणार नाही असे पक्षश्रेष्ठींकडून सांगितले जात आहे. तरीही राज्यपालांचे निमंत्रण आणि राजकीय हालचाली पाहता काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांचे विधान समोर आले आहे. त्यांनी रविवारी एका माध्यमाशी बोलताना सांगितले, की शिवसेना पाठिंबा देत असेल तर काँग्रेस सत्ता स्थापनेचा प्रयत्न करणार आहे.

राष्ट्रवादी करणार भाजपला विरोध

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सत्ता स्थापनेसाठी भाजपला निमंत्रण देताच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात राजकीय हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितल्याप्रमाणे, भाजप बहुमत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादी त्यांच्या विरोधात मतदान करणार आहे. यावेळी शिवसेना देखील भाजपच्या विरोधात मतदान करत असल्यास पर्यायी व्यवस्थेवर विचार सुद्धा केला जाईल असे मलिक यांनी स्पष्ट केले.

blank