गोंदिया,दि.21ः- आज सर्वत्र राज्यात सरकार बनविण्याच्या बाबतीत चर्चा होत आहे. तेव्हा भाजपा आपल्या संघटनेच्या निवडणुकीत लागलेला आहे. बुथ व मंडळाच्या निवडणुकीत सर्वांनी सोबत बसून सर्वसंमतीने निर्णय घ्यायचा आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांत काहीतरी वेगळे गुण असतात त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार जवाबदारी द्यावी. मागील निवडणुकीचा परिणाम अभ्यासासाठी करावा. समाज, व्यक्ति, परिवार यांना जोडण्याचे काम करावे. केंद्र व राज्य सरकारने अनेक लोककल्याणकारी निर्णय व योजनेतुन कार्य केले आहे. मात्र, आपण कुठेतरी कमी पडलो असे दिसते. त्यामुळे संघटनेच्या कामात स्वत:ला झोकून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हा निवडणुक पर्यवेक्षक, प्रदेश प्रवक्ता आ. गिरीश व्यास यांनी केले.
ते २१ नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथील गुरूकृपा लॉन येथे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित भाजपा जिल्हा संघटन पर्व कार्यशाळेत बोलत होते. यावेळी मंचावर आमदार विजय रहांगडाले, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी आ. केशव मानकर, माजी आ खोमेश रहांगडाले, माजी आ भेरसिंह नागपुरे, माजी आ संजय पुराम, माजी आ रमेश कुथे, माजी आ गोपालदास अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, महामंत्री संघटन वीरेंद्र अंजनकर, जि.प. उपाध्यक्ष अल्ताफ हमीद, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नेतराम कटरे, रचना गहाने, सीता रहांगडाले, अरविंद शहापुरकर, जि.प. सभापती विश्वजित डोंगरे, रमेश अंबुले, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, आशिष बारेवार, कौशल्या कुंभरे, जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, झामसिंग येरने, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, अर्बन बँक अध्यक्ष महेश जैन, प्रफुल अग्रवाल, सुभाष आकरे, राजेश चतुर, लक्ष्मीकांत बारेवार, शेषराव गिरीपुंजे, रघुनाथ लांजेवार, सविता पुराम, संतोष चव्हाण, रेखलाल टेंभरे, अशोक चौधरी,प्रकाश रहमतकर, अर्जुन नागपुरे, डॉ. प्रशांत कटरे उपस्थित होते.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, बुथ व मंडळाच्या निवडणुका नियमानुसार व निर्धारित कालावधीत करायचे आहेत. २२ ते २५ नोव्हेंबरपर्यंत सर्व बुथ अध्यक्ष, २७ ते ३ नोव्हेंबरपर्यंत मंडळ अध्यक्ष तर जिल्हाध्यक्षांची निवडणूक १५ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे ते बोलले. जिल्हाध्यक्ष पटले यांनी सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हे भाजपसाठी समाधानकारक नसून चिंतनाची गरज आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्राम पंचायतीच्या निवडणुका आहेत. जे काम मागील पाच वर्षात केंद्र व राज्य सरकारद्वारे झाले ते या आधी कधी झाले नाही, मात्र तशी मते मिळाली नाही. व्यक्तीहिताचा राजकारण करण्याचा काहींनी प्रयत्न केला. काही शरीराने आपल्या सोबत आहेत, मात्र मनाने दुसऱ्या ठिकाणी आहेत. या पुढे, असे चालणार नाही, अशांनी ठरवून घ्यावे. संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. मिळणारे पद व जवाबदारी हे तुमच्या कामामुळे असल्याचे ते बोलले.
आ. विजय रहांगडाले म्हणाले की सरकार बनेल का आणि केव्हा बनेल, याची चिंता आम्ही करीत नाही. एक निवडणुकीच्या पराभवाने काही होत नाही, पुन:श्च आपल्याला जोमाने पुढे जायचे आहे. या संघटन पर्वात जो पक्षाचा निष्ठावान व योग्य असेल त्यालाच जवाबदारी मिळावी, असे सांगून २२ ते २५ नोव्हेंबर पर्यंत नागपुर येथे होणाऱ्या ‘अॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनी संबधी माहिती देवून लाभ घेण्याचे आवाहन केले.
माजी आमदार अग्रवाल यांनी सांगितले की, मी कुठल्याही पदाची लालसा न ठेवता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला. निवडणुकीत पराभव झाला असला तरी भविष्यात गोंदिया विधानसभेत निश्चितच कमळ फुलणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी उत्कृष्ठ मंडळ अध्यक्ष कार्यासाठी सालेकसा मंडळाचे अध्यक्ष परसराम फुंडे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच पूर पीडितांसाठी मोठी निधी संकलित करून पाठविण्याच्या कार्यासाठी गोंदिया शहर अध्यक्ष सुनिल केलनका यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी दिनेश दादरीवाल यांनी पदवीधर मतदार नोंदणीबाबत माहिती दिली. कार्यशाळेचे संचालन जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर व आभार जिल्हा उपाध्यक्ष दिपक कदम यांनी मानले. या वेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





