23.5 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ घोटाळय़ातील दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

घोटाळय़ातील दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन

0
29

गोंदिया,दि.24 : नगर परिषदेतील मोफत नळ जोडणी योजनेच्या घोटाळा प्रकरणाने आता नवीन वळण घेतले असून युवक कॉंग्रेससह नगरसेवक लोकेश यादव, भागवत मेर्शाम, सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल, देवा रूसे यांनी उचलून धरले आहे. दरम्यान त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार यांची भेट घेवून त्वरित चौकशीची व कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा युवक कॉंग्रेसतर्फे जिल्हाधिकार्‍यांना याप्रकरणी चौकशीसाठी २१ नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. यावर जिल्हाधिकार्‍यांनी नगर रचना अधिकारी व प्रभारी मुख्याधिकारी जाधव व उपविभागीय अधिकारी गोंदिया यांची चौकशी समिती स्थापित केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पाणी पुरवठा विभागाचे कनि. अभियंता शेंडे व कंत्राटदार गज्जू नागदवने यांची २२ नोव्हेंबर रोजी चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात १ कोटी २६ लाखांचे देयक कंत्राटदाराला अदा करण्यात आले असून ते साहित्य खरेदीसाठी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, त्या रकमेचा साहित्य खरेदी करण्यात आला का? कंत्राटदाराच्या खात्यातून कोणाच्या नावे धनादेश देण्यात आले? साहित्याची शहानिशा व बिलाची चौकशी झाल्यानंतरच हे समोर येईल. मागील ८ महिन्यांपासून टेंडर मिळाल्यावर व तीन महिनेपासून आगाऊ रक्कम मिळाल्यानंतर ही मोफत नळ जोडणी का होऊ शकली नाही? शासनाच्या या निधीचा दुरूपयोग तर झाला नाही? या सर्व बाबी तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
चौकशी दरम्यान साहित्य ठेवण्याची जागा ही मरारटोली येथील सांस्कृतिक भवनातील एक कक्ष असल्याचे दाखविण्यात आले असून यातील साहित्य कोणाचे आहे व खरे प्रकरण काय? हे लवकरच उजेळात येईल. या कक्षाला चौकशी अधिकार्‍यांनी सील केले असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी घोटाळा सिद्ध झाल्यास कोणते पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी, कर्मचार्‍यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे, हे देखील लवकरच पुढे येणार आहे.