24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home राजकीय घाबरू नका, ही आघाडी दीर्घकाळ चालणार; उद्धव ठाकरे

घाबरू नका, ही आघाडी दीर्घकाळ चालणार; उद्धव ठाकरे

0
23

मुंबई/नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – महाराष्ट्रात सत्ता स्थापना आणि बहुमत सिद्ध करण्याबाबत सुरू असलेल्या महाभारतावर रविवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सादर करण्यात आलेल्या युक्तीवादावर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी उत्साही आहेत. तिन्ही पक्ष लवकरात-लवकर बहुमत चाचणी घेण्यासाठी कोर्टाच्या आदेशाचा आधार घेऊ इच्छित आहेत. त्यामुळेच, तिन्ही पक्षांनी आपल्या आमदारांसह अपक्ष आमदारांचे सुद्धा शपथपत्र सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टात सादर करण्याची तयारी केली आहे.

कोर्टात या पक्षांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि डॉ अभिषेक मनु सिंघवी यांच्या टीमने शपथपत्र गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. टीमशी संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 150 पेक्षा अधिक आमदारांचे शपथपत्र घेण्याची तयारी आहे. जेणेकरून लवकरात-लवकर फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी मजबूत करता येईल. सोबतच, कोर्टाला सुद्धा आदेश देताना काही तांत्रिक अडचणी येणार नाहीत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वाक्षऱ्या घेण्याचे काम रविवारीच सुरू करण्यात आले आहे. सर्वच शपथपत्र रविवार रात्री दिल्लीत पोहोचतील. बहुमत चाचणीशी संबंधित वादात याचिकाकर्त्यांकडून आमदारांचे शपथपत्र कोर्टात सादर करण्याची ही पहिलीच वेळ ठरेल.

सुप्रीम कोर्टात रविवारी झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार आणि भाजपचे दावे खोटे ठरवण्यासाठी काँग्रेसच्या वकिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 41 आमदारांचे हमीपत्र सुप्रीम कोर्टात दाखल केले होते. याच दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे एकमेकांच्या संपर्कात आहेत. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आप-आपले आमदार वेग-वेगळ्या हॉटेलांमध्ये सुरक्षित ठेवले आहेत.

राज्यात घडलेल्या राजकीय उलथापलथीनंतर रविवारी सुप्रीम कोर्टात विरोधकांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. शिवसेनेतर्फे सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे कपिल सिब्बल म्हणाले की, सरकार स्थापनेबाबत राज्यपालांनी पक्षपात केला आहे. आजच फ्लोर टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात यावेत. आम्ही उद्या बहुमत सिद्ध करण्यास तयार आहोत. तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला की, राष्ट्रवादीचे 54 पैकी 41 आमदार शरद पवारांसोबत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोर टेस्ट हा सर्वात चांगला मार्ग आहे यावर कोणीही प्रश्न उपस्थित करत नाहीत. असे कोर्टाने म्हटले आहे.

घोडेबाजार रोखण्यासाठी सरकार स्थापन झाल्यानंतर 24 तासांच्या आत फ्लोर टेस्ट करावी, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती एनव्ही रमना, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना या याचिकेवर सुनावणी करत आहेत. तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सरकारच्या वतीने उपस्थित आहे.

कोर्टात सिब्बल यांनी केलेला युक्तीवाद

महाविकासआघाडीच्या वतीने सुप्रीम कोर्टात बाजू मांडणारे कपिल सिब्बल यांनी रविवारी कोर्टाला त्रास दिल्या याबाबत दिलगिरी व्यक्त केली. विधानसभेतील बहुमताचा आकडा 145 आहे. निवडणूकपूर्व युतीला प्रथम संधी मिळते. परंतु निवडणूकपूर्व युती तुटली. आता आम्ही निवडणुकीनंतरच्या युतीवर अवलंबून आहोत असे सिब्बल म्हणाले.

सिब्बल यांनी कोर्टात केलेला युक्तीवाद

  • “शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने 22 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये समान किमान कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल असे सांगण्यात आले होते. मात्र यानंतर जे झाले ते धक्कादायक होते. मी यापूर्वी असे कधीच पाहिले नव्हते. त्यांनी राष्ट्रपती राजवट हटवली. यावर कॅबिनेटची बैठक देखील झाली नाही. जर कॅबिनेटची बैठक झाली नसेल तर नक्कीच आणीबाणी झाली असेल. सकाळी आठ वाजेच्या सुमारास फडणवीसांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले. मात्र सरकारकडे बहुमत होते की नाही हे रहस्यच राहिले. कोणतीही सार्वजनिक कागदपत्रे ठेवली गेली नाहीत. राज्यपाल थेट सूचनांवर काम करत आहेत. अन्यथा अशा गोष्टी घडल्या नसत्या.”
  • जर त्यांच्याकडे बहुमत असेल तर त्यांनी ते सिद्ध करावे. महाराष्ट्राच्या जनतेला एक सरकार पाहिजे. आमच्याकडे बहुमत आहे आणि आम्ही ते सिद्ध करण्यास तयार आहोत. आम्ही ते उद्याच सिद्ध करू शकतो.
  • राज्यपालांनी सत्ताधारी पक्षाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. यामागे वेगळाच उद्देश असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्र भाजपकडून मुकुल रोहतगी यांनी युक्तीवाद केला

  • रोहतगी म्हणाले की, “रविवारी सुनावणी का होत आहे हे मला कळत नाहीये. अशाप्रकारे रविवारी सुनावणी झाली नाही पाहिजे. माझ्या मते हे प्रकरण सूचीबद्धच व्हायला नको होता. ही याचित अगोदर मुंबई उच्च न्यायालयात दाखल व्हायला हवी होती.”
  • ते पुढे म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालय अ‍ॅडव्हान्स फ्लोर टेस्टचा आदेश देऊ शकते का? याचिकेत महत्वाचे दस्तावेज नाहीयेत. या लोकांना याबाबत काहीच माहीत नाही. तीन आठवड्यांपासून हे लोक झोपा काढत होते. त्यांनी केलेल्या दाव्याच्या समर्थनासाठी एकही दस्तावेज उपलब्ध नाहीये.”’
  • “कलम 212 नुसार त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये अनियमितता आहे या कारणास्तव कोणत्याही विधानसभा कार्यवाहीच्या वैधतेवर प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. जर सभागृहाने हे विधेयक मंजूर केले आणि सर्वोच्च न्यायालयाला 2 वर्षात सर्व प्रकरणे निकाली काढण्यास सांगितले तर काय होईल? (यावर कोर्टात एक हशा उठला) यानंतर न्यायमूर्ती रमना म्हणाले की, असे होऊ शकते का? आम्हाला माहीत नव्हते.

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी केलेला युक्तीवाद

  • स्वाक्षरी केलेल्या सत्यापित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे, प्रथमतः बहुमताच्या आधारे राज्यपालांनी ठरवलेले निकष असल्याचे दिसून येते. आम्ही शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता घोषणा केली की, आम्ही सरकार स्थापनेचा दावा सादर करणार आणि उद्धव ठाकरे सरकारचे नेतृत्व करतील. तर राज्यपाल वाट पाहू शकत नव्हते का? असा सवाल सिंघवी यांनी यावेळी विचारला.
  • केवळ 42-43 आमदारांच्या समर्थनाच्या आधारावर अजित उपमुख्यमंत्री कसे होऊ शकतात? ही लोकशाहीची हत्या आहे. अजित पवार पक्षाचे नेता नाहीत. जर त्यांच्याकडे स्वतःच्या पक्षाचे समर्थन नसताना ते उपमुख्यमंत्री कसे होऊ शकतात असा सवालही सिंघवी यांनी उपस्थित केला.
  • राष्ट्रवादी काँग्रेसकडे 54 आमदार आहेत. यातील 41 शरद पवारांसोबत आहेत. या 41 आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहून सांगितले की, अजित पवार यांना विधिमंडळ गटनेते पदावरून हटवण्यात आले आहे. 1998 मधील उत्तर प्रदेश किंवा 2018 मधील कर्नाटकचे प्रकरण या दोन्ही प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नेहमीच तात्काळ फ्लोर टेस्टचे आदेश दिले आहेत. जो श्रेष्ठ असतो त्याचाच विजय होऊ शकतो. त्यामुळे आज किंवा उद्या फ्लोर टेस्ट करण्यास अडचण काय आहे? ज्यांनी काल बहुमताचा दावा करून शपथ घेतली आणि आज ते फ्लोर टेस्टपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहेत असे कसे होऊ शकते?
  • शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संवाद साधला. हॉटेल रिनेसॉमध्ये झालेल्या या भेटीत, चिंता करण्याचे काहीच कारण नाही, ही आघाडी (काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना) दीर्घकाळ चालणार आहे असे आमदारांशी संवाद साधताना उद्धव म्हणाले आहेत. आमदारांच्या समूहाला संबोधित करताना त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राउत देखील उपस्थित होते.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे 44 आमदार सध्या रिनेसॉ हॉटेलमध्ये थांबले आहेत. महाराष्ट्रात शनिवारी भाजपने अजित पवारांच्या मदतीने सत्ता स्थापित केली. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने आप-आपल्या आमदारांना वेग-वेगळ्या हॉटेलांमध्ये थांबवले आहे. या सर्व हॉटेलांबाहेर चोख सुरक्षा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला. राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव काकाटे गेल्या दिवसभरापासून बेपत्ता होते. ते अजित पवारांसोबत राजभवनात गेले होते असेही सांगितले जाते. तेच काकाटे रविवारी सकाळपासून या हॉटेलात पोहोचले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या आमदारांची भेट घेतली, तेव्हा संजय राउत, युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचा एक फोटो समोर आला आहे.