25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ आज शिवसेनेतर्फे तालुकास्तरीय शेतकर्‍यांचा मोर्चा

आज शिवसेनेतर्फे तालुकास्तरीय शेतकर्‍यांचा मोर्चा

0
26

आरमोरी,दि.२५ः यावर्षी नैसर्गिक अस्मानी संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी शासनाने आठ हजार रूपयांची मदत जाहीर करून शेतकर्‍यांची थट्टा केली आहे. त्यामुळे आज सोमवार २५ नोव्हेंबर रोजी शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी व एकरी २५ हजार रूपये नुकसान भरपाई देण्याच्या मागणीला घेऊन शिवसेनेच्या वतीने तालुकास्तरावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवसेनेच माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी यांनी पत्रकार परिषदेतून दिली.
पत्रकार परिषदेला सुनील पोरेड्डीवार, प्रभारी जिल्हा समन्वयक राजू अंबानी, जिल्हा संघटक महेंद्र शेंडे, माजी जि.प. सभापती वेणूताई ढवगाये, मोरेश्‍वर चलअलवार, विजय मुरवतकर, अंकुश खरवडे, ज्ञानेश्‍वर ढवगये, पंकज आखाडे व इतर शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी आ. डॉ. मडावी म्हणाले, नुकताच नुकसानभरपाई झालेल्या शेतकर्‍यांना मदत म्हणून हेक्टरी आठ हजार रूपये राज्यपालन जाहीर केली. ही मदत तुटपुंजी असून शिवसेनेचा आधीपासूनच अजेंडा आहे की, सरसकट लहान-मोठय़ा शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. शेतकर्‍यांवर कोणतीही अट घातली जाऊ नये, त्यांचा सातबारा कोरा करून त्याला सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, नुकसानग्रस्त झालेल्या सर्व शेतकर्‍यांना एकरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी, शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा , यासाठी शेतकर्‍यांच्या मुलांना बारावी, महाविद्यालय परीक्षेची फी दहावीची फी इतर फी सरसकट माफ करून बारावीपयर्ंतच्या विद्यार्थ्यांना मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, ज्या शेतकर्‍यांना विमा आपल्या शेताचा विमा उतरवला असेल तर शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थिती जाहीर झाल्यामुळे सरसकट संपूर्ण लाभ देण्यात यावा. यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांना घेऊन तालुकास्तरावर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा गडचिरोली जिल्ह्याचे संपर्कप्रमुख किशोर पोद्दार यांच्या नेतृत्वात नेतृत्वात तहसील कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहिती माजी आ. मडावी यांनी दिली.