वाशिम, दि. २६ : शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये शासनाच्या मान्यतेनुसार शालेय क्रीडा स्पर्धेत नवीन चार क्रीडा प्रकारांचा समावेश झाला आहे. या क्रीडा प्रकारांचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत करण्याचे संचालनालयाकडून निर्देशित केलेले आहे. बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, फ्लोअरबॉल, हाफ किडो बॉक्सिंग या खेळांचा यात समावेश आहे.बेल्ट रेसलिंगच्या १९ वर्षे मुले व मुलींच्या तर थायबॉक्सिंग, फ्लोअरबॉल, हाफ किडो बॉक्सिंगच्या १७ व १९ वर्षे मुले व मुलींच्या गटांच्या शालेय स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. अटी व शर्तींच्या अधीन राहून मान्यता दिलेली असल्याने सहभागी खेळाडूंना विविध योजनांचा लाभ अनुज्ञेय असणार नाही. यात प्रामुख्याने शासकीय, अशासकीय नोकऱ्यांमधील खेळाडूंचे आरक्षण मिळणार नाही, क्रीडागुण सवलत, क्रीडा शिष्यवृत्ती मिळणार नाही. रोख पारितोषिके, तसेच अकरावीच्या प्रवेशासाठी खेळाडू आरक्षण अनुज्ञेय राहणार नाही. विविध स्पर्धांसाठी शासनाचे मनुष्यबळ, आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धा आयोजन संदर्भात आज सभा
बेल्ट रेसलिंग, थायबॉक्सिंग, फ्लोअरबॉल, हाफ किडो बॉक्सिंग या खेळांचे शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन ऑनलाईन प्रक्रियेद्वारे केले जाणार आहे. तरी वाशिम जिल्ह्यातील या खेळांच्या अधिकृत संघटना पदाधिकाऱ्यांनी खेळांच्या स्पर्धा आयोजनासाठी बुधवार, २७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह व स्पर्धा तारीख, ठिकाण आदीसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे.



