वाशिम, दि. 27 : ग्रामीण आणि शहरी भागातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी आणि या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी रुरल मार्टच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबाकडे नेण्याचा मार्ग प्रशस्त होत आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्ड पुरस्कृत व महिला आर्थिक विकास महामंडळ वाशिम यांच्या माध्यमातून महिला बचतगटांना आपले उत्पादन विक्रीची हक्काची बाजारपेठ रुरल मार्टच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे.
कारंजा येथे 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता बस्टँडरोड मार्गावरील वानखेडे कॉम्प्लेक्स येथे रुरल मार्ट या महिला बचतगटांच्या उत्पादीत विक्री केंद्राचे उदघाटन जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक हे करतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून राष्ट्रीय कृषी विकास बँकेचे महाराष्ट्र क्षेत्रिय कार्यालय पुणे येथील मुख्य महाप्रबंधक यु.डी शिरसालकर यांची उपस्थिती राहणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणून अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, महिला आर्थिक विकास महामंडळाचे विभागीय संनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी केशव पवार, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नाबार्डचे वाशिम येथील सहायक महाप्रबंधक विजय खंडरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे हे उपस्थित राहतील.
रुरल मार्ट या महिला बचतगटाव्दारे उत्पादीत वस्तू विक्री केंद्रामध्ये हळद, गहू, चनादाळ, मुगदाळ, उडीददाळ, ज्वारी, बेसन, गव्हाचे पिठ, हरभरा, तीळ आदी सेंद्रिय उत्पादने, कलाकृतीच्या वस्तुमध्ये आर्टीफिशियल रांगोळी, तोरण, टेबल क्लॉथ, मायक्रॉन वस्तु, मातीचे भांडे, लेदर बॅग, शोभेची फुलदाणी, मातीचे फ्लॉवर पॉट, मातीच्या मुर्ती, खाद्यपदार्थामध्ये तांदळाचे पापड, गव्हाचे पापड, ज्वारीचे खारोडे, मुंग वडी, मुंग व उडीद पापड, शेवळया, इतर वाळवणाचे पदार्थ, लाकडी घाणीचे तेल तसेच विविध प्रकारचे लोणचे, तिखट/ मसाले, गुळपट्टी, तिळपट्टी, गोवऱ्या, पानाच्या पत्रावळी, गावराणी अंडे, गोमुत्र, फरसाण आदी विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. तरी ग्राहकांनी या रुरल मार्टमधून जास्तीत जास्त संख्येने बचतगटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंची खरेदी करुन त्यांच्या उत्पादीत वस्तु व साहित्याला प्रोत्साहन दयावे. असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे यांनी केले आहे.




