गोंदिया,दि.27 : संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर रोजी सामाजिक न्याय भवनातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.प्रदर्शनाचे उद्घाटन महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक विनोद ठाकूर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी अरविंद ढोणे यांची उपस्थिती होती. उद्घाटक म्हणून बोलताना श्री सोसे म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे देशाचा राज्यकारभार चालतो. आपल्या संविधानामुळे देशाला प्रगल्भ व आदर्श लोकशाही व्यवस्था लाभली आहे असे त्यांनी सांगितले. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन यावेळीकरण्यात आले. आयोजित ग्रंथप्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण खंड, भारतीय संविधान,स्पर्धा परिक्षेची पुस्तके ठेवण्यात आली होती.या कार्यक्रमाला वाचक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी ढोणे यांनी मानले.
मॉडेल कॉन्व्हेंट ऍण्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिवस साजरा
गोरेगाव स्थानीय मॉडेल कॉन्व्हेंट एन्ड विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे 26 नोव्हेंबर 2019 रोजी संविधान दिवस शाळेचे संस्थापक आर.डी. कटरे, प्राचार्या छाया पी. मेश्राम,आर.बी.कांबळे,शाळेचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त शाळेत विविध स्पर्धा आयोजिय करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त आपले विचार मांडले. शाळेचे संस्थापक आर.डी.कटरे यांनी संविधान दिनावर विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडण्यासाठी सर्व विध्यार्थी व शिक्षक वृंद यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन मनिष कोल्हे स शि. यांनी केले.
संविधान दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
गडचिरोली : गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून घेतले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, उप जिल्हाधिकारी निवडणूक कल्पना निळ-ठुबे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसुळ, जिल्हा सूचना अधिकारी एस.आर.टेंभूर्णे, सहायक नियोजन अधिकारी सागर पाटिल, नायब तहसिलदार सुनिल चडगुलवार, जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, अधिक्षक किशोर भांडारकर इत्यादी उपस्थित होते.
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात इंदिरा चौकांमध्ये आज संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संविधानाबाबत जनजागृतीपर घोषणा दिल्या. तसेच रॅलीचे आयोजनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली, आंबेडकरवादी विचार मंच, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी गडचिरोली न्यायालय कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.




