25 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ देवरी तालुक्यातील 8 अवैध धान खरेदी केंद्रांवर बाजार समितीची धाड

देवरी तालुक्यातील 8 अवैध धान खरेदी केंद्रांवर बाजार समितीची धाड

0
31

देवरी,दि.29ः-देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव लोकेश सोनुने यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात सुरु असलेल्या अवैधरित्या धान खरेदी केंद्रावर विशेष मोहिमेतंर्गत २६ नोव्हेंबरपासून धाड सत्र राबविण्यात येत आहे. यातंर्गत काही अवैध धान खरेदी केंद्रावर कारवाई करण्यात आल्याची माहिती सोनुने यांनी दिली आहे.
बाजार समितीचे सचिव सोनुने यांनी दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामाच्या धान कापणीला सुरुवात झाली असून, अनेक शेतकरी आपले धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आणत आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने व्यापार्‍यांना धान खरेदीसाठी परवाना दिला जातो. परंतु तालुक्यात अनेक व्यापारी अवैधरित्या धान खरेदी करीत असल्याचे निदर्शनास आले. यावर आळा घालण्यासाठी व शेतकर्‍यांची लूट थांबविण्यासाठी बाजार समितीच्या वतीने २६ नोव्हेंबरपासून विशेष मोहिमेतंर्गत धाड सत्र राबवून कारवाई करण्यात येत आहे. यातंर्गत बोरगाव बाजार, परसोडी, चिल्हाटी, मेहताखेडा, येळमागोंदी, घोनाडी, पालांदूर जमी., चिचगड आदी गावात धाड टाकून तपासणीची कारवाई करण्यात आली आहे. यात अवैधरित्या धान खरेदी करणार्‍या ८ व्यापार्‍यांवर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४६ अन्वये दंडात्मक कारवाई करुन वजनकाटे जप्त करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेबाबत सोनुले यांनी सांगितले की, अवैधरित्या धान खरेदीमुळेबाजार समितीच्या महसुलाचे नुकसान होत आहे. तसेच शेतकर्‍यांची लुट होत आहे. व्यापारी शेतकर्‍यांच्या गरजेचा लाभ घेत कमी दरात धानाची खरेदी करीत आहेत. धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे ठेवणे गरजेचे असताना तालुक्यातील बहुतांश केंद्रावर साध्या वजनकाट्याने धानाची वजन केले जात आहे. यातून शेतकर्‍यांची फसवणूक होत आहे. या बाबी या मोहिमेतून समोर आलेल्या आहेत. ही मोहिम यापुढे तीव्र करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कारवाईमुळे अवैधरित्या धान खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.