लाखनी,दि.03ः- स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे महत्वपूर्ण व्यासपीठ आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, सांस्कृतिक, वैज्ञानिक क्षेत्रातील सुप्त गुण आपल्याला दिसून येतात आणि हे सर्व गुण भरभरुन बघताना खुप आनंद होतोय असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी आणि विचारवंत प्रल्हाद सोनेवाने यांनी केले.द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल लाखनीच्या १६ व्या स्नेहसंमेलन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्र. गटशिक्षणाधिकारी सुभाष बावणकुळे उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे विश्वस्त महेंद्र राऊत, संचालक संजय वनवे, प्रा. रेवाराम खोब्रागडे, शाळेच्या प्राचार्य आशा वनवे, आशिष बडगे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर अतिथी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
काळ बदलतो, पद्धती बदलतात, असं असलं तरी शिक्षणाचा उद्देश एकच असतो. ज्ञानार्जनाची प्रक्रीया म्हणजे शिक्षण आणि म्हणून या प्रक्रियेतुन जाताना अधिकाधिक ज्ञान प्राप्त करा आणि मोठं ध्येय ठेवून वाटचाल करा असे प्रतिपादन प्र. गटशिक्षणाधिकारी सुभाष बावणकुळे यांनी अध्यक्ष म्हणून बोलताना केले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शाळेचे हस्तलिखित “ब्लॉसम” याचे प्रकाशन करण्यात आले व स्नेहसंमेलनामध्ये आयोजित कला प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी स्पर्धा हे विशेष आकर्षण होते. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांचा आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविकाच्या माध्यमातून शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती प्राचार्य आशा वनवे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्यन खोब्रागडे व पेजल भुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशिष बडगे यांनी केले.




